शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या दोन दिवसांत खुनाचे सत्र सुरूच असून खुनाचे चार प्रकार घडले आहेत. गेल्या वर्षभरात शहरात एकूण १३३ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये पिस्तुलाचा वापर करून खून करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याबरोबरच टोळीयुद्धाने या वर्षी डोके काढल्यामुळे पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेतची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खुनाच्या घटनेत वाढ झाली आहे.
पुणे हे एक सांस्कृतिक, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून खुनाच्या घटना वाढत चालल्या आहेत. पुण्यात २०१२ साली ११५ खुनाच्या घटना घडल्या होत्या. २०१३ मध्ये १२९ तर या वर्षी आतापर्यंत १३३ खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये पिस्तुलाचा वापर करून खून केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक घटना या पिंपरी-चिंचवड आणि उपनगर परिसरात घडल्या आहेत. जमिनीचे वाद, संपत्ती, पूर्ववैमनस्य, किरकोळ कारण, हेवे दावे या कारणावरून खून झाल्याचे आढळून आले आहे. अलिकडे खून करताना अत्यंत क्रूर पद्धतीने वार केल्याचे आढळून येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबरोबर गेल्या काही महिन्यात पुण्यात टोळीयुद्धाने डोके वर काढले आहे. थेट शहराच्या मध्यवस्तीजवळ असलेल्या वैकुंठ स्मशानभूमी येथे गज्या मारणे टोळीकडून नीलेश घायवळ टोळीतील गुंडाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. तसेच, त्या त्या भागातील स्थानिक गुंडाकडून वर्चस्वातून किंवा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राचा अथवा पिस्तुलाचा वापर करून खून केल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांचा गुंडावरील वचक कमी झाल्यामुळेच गुंडाकडून थेट पिस्तुलाचा वापर करून मध्यवस्तीत गोळीबार करण्याचे धाडस होत आहे. शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत.
महत्त्वाच्या खुनाच्या तपास लागेना
एकीकडे शहरात खुनाच्या घटना वाढत असताना दुसरीकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर, पुणे विद्यापीठातील रखवालदार, मारुंजी रस्त्यावर संगणक अभियंत्याचा खून, सदाशिव पेठेतील आशा लगड यांचा खून, दर्शना टोंगारे, मित्र मंडळ चौकातील हरि ढमढेरे यांचा खून या घटना उघडकीस आणण्यात अपयश आले आहे. यातील डॉ. दाभोलकर व दर्शना टोंगारे यांच्या खुनाच्या गुन्ह्य़ात आरोपींना पकडण्यात अपयश आल्यामुळे त्याचा तपास सीबीआय आणि सीआयडीकडे देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा