पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पिस्तुलाचा वापर करून खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी सारख्या गुन्ह्य़ाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता नवीन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी पिस्तुलाचा वापर करून गुन्हे केलेल्या दहा वर्षांतील गुन्हेगारांची यादी तपासण्याचे काम सुरू केले आहे. तसेच, परराज्यातून येणाऱ्या अग्निशस्त्रावर लक्ष ठेवण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गोळीबार करून खून, खुनाच्या प्रयत्नाच्या अलीकडे अनेक घटना घडल्या आहेत. कुख्यात अप्पा लोंढेच्या खुनातील आरोपींकडून पोलिसांनी तब्बल अकरा पिस्तूल, तर, चाकण येथील खून प्रकरणात चार पिस्तूल जप्त केली आहेत. तसेच, दरोडय़ाच्या गुन्ह्य़ातही एक पिस्तूल जप्त केले आहे. देहू रोड, चाकण, पौड, मावळ, या परिसरात पिस्तुलाचा वापर करून अनेक गुन्हे घडले आहेत. त्यामुळे आता अग्निशस्त्राचा वापर करून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ग्रामीण पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
याबाबत डॉ. जाधव यांनी सांगितले की, पुणे ग्रामीण परिसरात गेल्या दहा वर्षांत पिस्तुलाचा वापर करून गुन्हे करणाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. तसेच, हे गुन्हे करणाऱ्या दीडशे गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली आहे. त्याबरोबरच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी सुद्धा या आरोपींकडे चौकशी करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सुधारित यादी करण्याचे काम देण्यात आले आहे. पुणे परिसरात येणारी पिस्तूल ही बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश परिसरातून येतात. यावर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, माहिती मिळाल्यास त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शस्त्रास्त्रांचा वापर करणाऱ्या गुन्हेगारांची ग्रामीण पोलिसांकडून तपासणी सुरू
पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पिस्तुलाचा वापर करून खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी सारख्या गुन्ह्य़ाचे प्रमाण वाढले आहे.
First published on: 10-06-2015 at 03:12 IST
TOPICSपिस्तूल
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime police pistol murder