लोणावळ्यात लहान मुलीवरील झालेला अत्याचार व कोल्हापुरातील कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या या दोन्ही घटनांबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर आहे, यातील आरोपी लवकरच गजाआड होतील. पानसरे यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना वेळ दिला असून आरोपी लवकर न सापडल्यास वेळप्रसंगी सीआयडी किंवा सीबीआयकडे तपास सोपवून आरोपी पकडू, असे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगवीत बोलताना स्पष्ट केले. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बट्टय़ाबोळ झाल्याचा अजितदादांनी केलेला आरोप फेटाळून लावत शिंदे यांनी राज्यातील परिस्थिती चांगली व नियंत्रणाखाली असल्याचे नमूद केले.
लोणावळ्याच्या घटनेतील आरोप दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. पानसरे यांच्या खुनातील आरोपींचा कसून शोध सुरू आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांच्या बाबतीत सरकार गंभीर आहे. स्थानिक पोलिसांनी लवकर तपास न केल्यास सीआयडी किंवा सीबीआयकडे तपास सोपवावा लागेल. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची बदली ‘प्लँचेट’ प्रकरणातून केल्याचे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यावरून िशदे म्हणाले, या विषयावर इतक्या उशिराने ते का भाष्य करत आहेत, त्यामागे हेतू काय आहे, हे शोधले पाहिजे. पोळ यांच्यावर काय कारवाई करायची, हे तपासाअंती ठरवले जाईल. गेल्या सरकारमध्ये अजित पवार महत्त्वाच्या पदावर होते. तेव्हा त्यांनी काहीच केले नाही. विरोधी पक्षात ते बोलण्यापलीकडे काही करत नाही. नको त्या विषयावर चर्चा करत बसतात. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला नाही, ती चांगली आहे. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे, असे गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

Story img Loader