पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चोरीच्या घटना घडल्यानंतर या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे ग्रामीण पोलिसांनी द्रुतगती मार्गावर तीन ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर पुणे ग्रामीणमधील सर्व महामार्गांवर गस्त घालण्यासाठी दरोडा प्रतिबंधक विभागाची दोन पथके तयार केली आहेत. या पथकांनी महामार्गावर गस्त सुरू केली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.
पुणे-मुंबई द्रुतगती आणि मार्गावर दोन जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांना या रस्त्यावर सुरक्षित वाटावे आणि त्यांना तत्काळ मदत मिळावी म्हणूनच पोलिसांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत लोहिया यांनी सांगितले की, द्रुतगती मार्गावर नागरिकांच्या मदतीसाठी ताजे पेट्रोलपंप, इंद्रायणी पूल, वडगाव-तळेगाव चौक या ठिकाणी नवीन पोलीस चौकी उभारण्यात येत आहे. तर, उर्से टोल नाका येथे अगोदरच एक चौकी सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना तत्काळ मदत मिळण्यास मदत होईल. तसेच, पुणे ग्रामीणच्या हद्दीतील पुणे-मुंबई, पुणे-नाशिक, पुणे-सातारा आणि पुणे-सोलापूर असे महामार्ग आहेत. या महामार्गावरील जबरी चोऱ्या आणि दरोडय़ांसारख्या घटना रोखण्यासाठी दोन दरोडा प्रतिबंध पथके तयार केली आहेत. यातील एक पथक पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि पुणे-नाशिक महामार्गवर गस्त घालीत आहे. तर, दुसरे पथक सोलापूर महामार्ग आणि सातारा रस्त्यावर गस्त घालीत आहे.
तुटलेल्या जाळ्या बसविण्याच्या सूचना
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कोणी येऊ नये म्हणून रस्त्याच्याकडेला लावण्यात आलेल्या जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. या ठिकाणाहून द्रुतगती मार्गावर येऊन चोरटे चोऱ्या करीत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणाहून नागरिक रस्त्यावर आल्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जाळ्या पूर्ववत करण्याच्या सूचना आयआरबीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.
प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सूचना
द्रुतगती मर्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. रस्त्याच्याकडेला असलेला वाहतूक फलक पाहून त्यावर दिलेल्या सूचना पाळाव्यात. एखाद्या ठिकाणी थांबायचे असल्यास हॉटेल, धाबा, पेट्रोलपंप किंवा वस्ती आहे, असे ठिकाण पाहून त्या ठिकाणी थांबावे, अशी सूचना पोलीस अधीक्षक लोहिया यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा