लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: शहरातील तब्बल ३८७ वॉशिंग सेंटरचालकांपैकी बेकायदा नळजोड घेणाऱ्या ३६ जणांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
शहराला गेल्या साडेतीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळा सुरू होताच शहरातील विविध भागांत अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने वॉशिंग सेंटर, उद्याने अथवा मोटारी धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. याच अनुंषगाने शहरातील वॉशिंग सेंटरचालक मोटारी धुण्यासाठी पाणी कोठून वापरतात, याचा शोध घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शहरातील वॉशिंग सेंटरचे फेरसर्वेक्षण करण्यात आले. शहराच्या विविध भागांत ३८७ वॉशिंग सेंटर असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. यामध्ये ३८ वॉशिंग सेंटरचालकांनी पाणी वापरासाठी व्यावसायिक परवाना घेतला आहे. २९० सेंटर चालक बोअरवेल, विहिरीतील पाण्याचा वापर करतात. तर, ३९ सेंटर अनधिकृत आढळून आले असून, ३६ जणांचे नळजोड तोडण्यात आले आहे. या सेंटर चालकांकडून पाणीपट्टी दंडासह वसूल करण्यात येणार आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच अशा वॉशिंग सेंटर चालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या मीटर निरीक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी दिली.