पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेने धमकावून अत्याचार आणि विनयभंगाचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधितांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास परगावी निघालेल्या प्रवासी तरुणीकडे आरोपी गाडेने वाहक असल्याची बतावणी केली. तरुणीला एका शिवशाही बसमध्ये नेले. दरवाजा लावून त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन दोनदा बलात्कार केला. या घटनेनंतर गाडे पसार झाला. घाबरलेली तरुणी मूळ गावी जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. अर्ध्या वाटेतून तरुणी परतली आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. पसार झालेल्या गाडेला पोलिसांनी शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली.

गाडेविरुद्ध यापूर्वी महिलांना लुटण्याचे गुन्हे पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर येथे दाखल झाले आहेत. २०१९ मध्ये गाडे हा मोटारचालक म्हणून काम करत होता. ज्येष्ठ महिलांना गावी सोडण्याची बतावणी करून तो त्यांना निर्जन ठिकाणी न्यायचा आणि त्यांना लुटून पसार व्हायचा. १९ जानेवारी २०२४ रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गाडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन पाेलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

याबाबत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे म्हणाले, ‘गाडेविरुद्ध यापूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. त्याने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास त्वरित पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार द्यावी.’

गाडेविरुद्ध तांत्रिक, तसेच वैद्यकीय पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय, तसेच लैंगिक क्षमता तपासणी करण्यात आली आहे. गुन्हा घडलेली संबंधित बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ताब्यात घेतली आहे. गाडेने त्याचा मोबाइल संच फेकून दिला आहे. तो हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचे मोबाइल संभाषण, तसेच त्याअनुषंगाने तांत्रिक तपास करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

गाडेचे कपडे जप्त

गाडेने गुन्हा करताना परिधान केलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. हे कपडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फाॅरेन्सिक) तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

पीडित तरुणीचा न्यायालयासमोर जबाब

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा जबाब सोमवारी न्यायाधीशांसमोर नोंदवून घेण्यात आला. संबंधित जबाब गोपनीय असून, पीडित तरुणीचा जबाब खटल्यात महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.