पुणे : स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेला एका तरुणाने मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी तरुणास वानवडी पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश पाटील (वय २४, रा.कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामटेकडी येथील डिजिटल हब येथे स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. फिर्यादी तरुण परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षेच्या वेळी उमेदवारांचे मोबाइल, कागदपत्रे आणि वस्तू ठेवण्यात आलेल्या पिशव्या बाहेर ठेवण्यात आल्या होत्या. फिर्यादी तरुणाने त्याची पिशवी बाहेर ठेवली होती. परीक्षा संपल्यानंतर तरुणाला पिशवी सापडली नाही.
एका परीक्षार्थीची पिशवी तेथे होती. मात्र, पिशवीतील मोबाइल चोरीला गेला होता. परीक्षा सुरू असताना मोबाइल चोरीचे प्रकार घडल्याने उमेदवारांनी तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले या प्रकरणाचा तपास करत होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून पाटील याला पकडले. मोबाइल चोरी करताना सीसीटीव्ही चित्रीकरणातील पाटील आढळून आला होता. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून मोबाइल संच, गणकयंत्र आणि दुचाकी असा ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी पाटील उच्चशिक्षित असून कंपनीत नोकरीस आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, उपनिरीक्षक संतोष सोनवणे आणि पथकाने ही कारवाई केली.