वाढत्या गुन्हेगारीने उद्योगनगरीत अस्वस्थता
वाहनांची तोडफोड, दुचाकींची जाळपोळ, राजकीय पाठबळावर पोसलेली गुंडगिरी यांसह पिंपरी-चिंचवडमधील विविध गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली, अशी ओरड सुरू असतानाच वाकडच्या घटनेने सर्वाचे डोळे खाडकन उघडले आहेत. एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका युवतीवर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना बालाजी सोसायटी संस्थेत घडली. ही युवती भाजप आमदाराची मुलगी असल्याचे उघड झाल्यानंतर उच्चपातळीवरून सूत्रे हलली.
एकतर्फी प्रेमातून वाकडला घडलेली ही काही पहिलीच घटना नव्हती. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येच अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. सात वर्षांपूर्वी आकुर्डीत स्वत:च्या मामेबहिणीवर एका तरुणाने हल्ला चढवला, त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला होता. चार वर्षांपूर्वी चिखली-कृष्णानगरला एकतर्फी प्रेमातून युवतीच्या अंगावर अॅसिड फेकण्यात आले होते. हिंजवडी, तळवडेसारख्या आयटी क्षेत्रातही एकतर्फी प्रेमाची व त्यातून घडणाऱ्या गुन्ह्य़ांची उदाहरणे कमी नाहीत. डिसेंबर २०१६ मध्ये तळवडय़ातील एका महिला संगणक अभियंत्याची एकतर्फी प्रेमातूनच भर रस्त्यावर हत्या झाली. ९० दिवसांनंतरही आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपीला जामीन मंजूर झाला, हे तर खूपच धक्कादायक होते. एकतर्फी प्रेमवीर असो की टवाळखोर यांच्याकडून होणारी महिलांची टिंगलटवाळी, छेडछाड, हल्ले ही काही आजची समस्या नाही. शाळा, महाविद्यालय, गर्दीच्या ठिकाणी, निर्जन परिसर अशा कोणत्याही ठिकाणी छेडछाड होऊ शकते. कधी एकटा-दुकटा ‘आशिक’ हा उद्योग करतो. तर, कधी गटागटाने फिरणारे टुकार असा ‘पराक्रम’ गाजवतात. अशा टवाळखोरांना वेळीच आवर घातला जात नाही म्हणूनच त्यांची हिंमत वाढते आणि पुढे जाऊन नको त्या घटना घडतात. एखादी मोठी घटना घडली, की मग त्यावर चर्चेची गुऱ्हाळं रंगतात. मात्र, काही दिवसांत पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ सुरू होते. अशा घटना सातत्याने होतच असतात. मात्र, प्रत्येक घटना प्रकाशझोतात येत नाही. वाकडच्या घटनेतील युवती भाजप आमदाराची मुलगी असल्याने यंत्रणा वेगाने हलली. हे प्रेमप्रकरण होते की एकतर्फी प्रेम की प्रेमाचा त्रिकोण होता, हे तपासाअंती पुढे येईल. मात्र, ज्या पद्धतीने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हे नाटय़ घडले, ते अंगाचा थरकाप उडवणारे होते.
पिंपरी-चिंचवड शहरात असे एकही शाळा-महाविद्यालय नाही, जिथे छेडछाडीच्या घटना होत नाहीत. महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळ घोळक्याने उभे राहणे, मुलींना अर्वाच्य, अश्लील भाषेत टोमणे मारणे, दुचाक्यांवर बसून मुलींच्या मागे हीरोगिरी करणे, चित्रविचित्र-कर्कश हॉर्न वाजवणे, असे प्रकार या रोडरोमिओंकडून सर्रास घडतात. पोलीस कधीतरी दखल घेतात, भरारी पथक पाठवून धरपकड करतात. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून फारच सौम्य भूमिका घेतात. काहीच होत नसल्याचे पाहून मुलांचे धाडस वाढते आणि पुढे जाऊन ते अशाच गोष्टी करत राहतात. अलीकडच्या काळात विद्यार्थीच महाविद्यालयात हत्यारे घेऊन येतात. बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा महाविद्यालयात मुक्त वावर आढळून येतो. महाविद्यालय प्रशासन अशा गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नाही. शिक्षणाचे केंद्र असलेल्या ठिकाणी गुन्हेगारीचे अड्डे तयार होऊ नयेत, याची पोलिसांनी व समाजाने देखील खबरदारी घेतली पाहिजे. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केले जाते आणि भविष्यात विपरीत काही घडलेच तर गळा काढण्याचे काम सुरू होते. त्यापेक्षा सुरुवातीच्या काळातच अशी टवाळखोरी मोडून काढली पाहिजे. जेणेकरून पुढचे धोके उद्भवणार नाहीत. अशा कामात इतरांनी हस्तक्षेप न करता पोलिसांना सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. अन्यथा, असे प्रकार होतच राहतील.
पोलिसांच्या आशीर्वादानेच वेश्याव्यवसाय?
उद्योगनगरीत पोलिसांच्याच आशीर्वादाने वेश्याव्यवसाय फोफावतोय की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. शहराच्या विविध भागात राजरोसपणे वेश्याव्यवसाय बोकाळला आहे. पोलिसांच्या ‘हप्तेगिरी’मुळे त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचे चित्र पुढे आले आहे. वरकरणी दाखवण्यात येणाऱ्या छापेसत्रामागेही वेगळेच ‘अर्थकारण’ असते आणि हप्ते न देणारे छाप्यांच्या माध्यमातून लक्ष्य केले जातात, हे आता लपून राहिलेले नाही. शहराच्या एका बाजूने जाणाऱ्या देहूरोड ते चांदणी चौक या दरम्यानच्या रहदारीच्या रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी ‘सेक्स रॅकेट’ सुरू असते, हे सर्वश्रुत आहे. पिंपरीच्या गजबजलेल्या चौकात छुप्या पद्धतीने हा ‘उद्योग’ कित्येक दिवसांपासून बिनबोभाट चालतो. संत तुकारामनगर येथील बसस्थानकाजवळ अंधार होताच तशा मंडळींचा वावर सुरू होतो. अडीच महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका महिलेवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली होती. रावेतच्या बहुचíचत पुलाजवळ ‘उच्चभ्रू’ मंडळींकडून इंटरनेटद्वारे संपर्क करत आलिशान मोटारीद्वारे असे ‘व्यवहार’ सर्रास सुरू असतात. किवळे पेट्रोलपंपाजवळ, पुलाजवळ, पुनवळे येथे एका प्रख्यात हॉटेलशेजारी दिवसाढवळ्या हाच प्रकार सुरू असतो. वाकडला जुन्या पोलीस स्टेशनच्या मागे तृतीयपंथीयांचा धुमाकूळ सुरू असतो. तळवडे येथे आयटी पार्कजवळ, नाशिक फाटा ते कलासागरसमोरच्या निर्जन जागेत, चिंचवड-देहूरोड हद्दीजवळ, दिघी-आळंदी रस्त्यावर, अशा अनेक ठिकाणी सुरू असणाऱ्या या ‘उद्योगाची’ पोलिसांना माहितीच नसते, असे काहीच नाही. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते, त्यामागे सरळसरळ ‘अर्थकारण’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी या धंद्यात भागीदार असतात. एखादी तक्रार आल्यास अथवा एखाद्या ठिकाणी फारच बोभाटा झाल्यास कारवाईचा देखावा केला जातो. त्यातही ज्यांच्याकडून ‘हप्ते’ मिळत नाहीत, त्यांच्यावर हमखास छापे टाकले जातात, ही या धंद्याची ‘मोडस’ असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
गल्लीबोळातील ‘भाईगिरी’ मोडून काढा
वाहनांची तोडफोड करत ‘भाईगिरी’ करण्याची खुमखुमी अनेकांना असल्याचे आतापर्यंत सातत्याने दिसून आले आहे. हातात हत्यारे नाचवत, गाडय़ांचे कर्कश हॉर्न वाजवत आरडाओरडा करत दहशत निर्माण करण्याचे प्रकार शहरात वाढतच आहेत. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ या प्रकारांनी कहर केला आहे. दोन एप्रिलला किरकोळ वादातून सांगवीत दहा वाहनांची तोडफोड झाली. २२ मार्चला चिंचवडला चारचाकी वाहने जाळण्यात आली. १७ मार्चला पिंपळे गुरव येथे चारचाकी वाहनांची तोडफोड झाली. चार जानेवारीला काळेवाडीत १६ वाहनांची तर १९ डिसेंबर २०१६ मध्ये नेहरूनगरला १७ वाहनांची तोडफोड झाली. १४ ऑगस्ट २०१६ मध्ये सांगवीत पूर्ववैमनस्यातून १२ वाहनांची तोडफोड झाली. १५ जुलै २०१६ ला चिखलीत वाहनांची तोडफोड करण्यात आली. ६ जून २०१६ मध्ये खडकीत गुंडांनी धुमाकूळ घालत ३० वाहनांची तोडफोड केली. ६ नोव्हेंबर २०१६ ला थेरगावात दोन गटातील वादात २० वाहनांची तोडफोड झाली. ४ नोव्हेंबर २०१६ ला देहूरोड येथे ५० जणांच्या टोळक्याने दहशत करत परिसरातील वाहनांची तोडफोड केली. एवढय़ावरच हे थांबलेले नाही. अलीकडे रात्री बारा वाजता वाढदिवस साजरे करण्याचे ‘फॅड’ पुढे आले असून त्याला पोलिसांची मूकसंमती आहे की काय, अशी शंकाही घेतली जाते. रात्री बाराच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी सुरू होते, ती बराच वेळ चालू राहते. ‘बर्थ डे बॉय’ तलवारीने केक कापतो. स्पीकरवर गाणी लावली जातात, त्यावर बीभत्स नाचगाणी होतात. यानिमित्ताने जो गोंगाट होतो, त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो. बंदुकीच्या गोळीच्या आवाजाप्रमाणे ‘फट्’ किंवा ‘ठो’ असा आवाज करणारे हॉर्न आहेत. अशी वाहने मध्यरात्रीनंतर सातत्याने फिरत असतात. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना अजून या सर्व प्रकारांची माहिती नसेल, असे मानणे चुकीचे ठरेल.