लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: सराईत गुन्हेगाराचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश सोहळा झाला. गुन्हेगाराला प्रवेश दिल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होताच शिवसेनेने हात झटकले.
प्रशांत भानुदास दिघे (वय ३१) असे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. दिघे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, लूटमार असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला शिवसेनेत पक्षप्रवेश देत चिंचवड विधानसभा युवासेना उपशहरप्रमुख हे महत्वाचे पद दिले. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढत खुलासा केला आहे.
आणखी वाचा- पुणे: सिंहगड किल्ला परिसरात दहा जणांवर मधमाशांचा हल्ला
काळेवाडीतील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी माझ्याकडे विनंती केल्यावरून प्रशांत दिघे याचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. वास्तविक त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती. दिघे याचा प्रवेश स्थगित करत असून शिवसेना (शिंदे गट) या पक्षाशी यापुढे दिघे यांचा काहीही संबंध राहणार नाही. तो पक्षाच्या कोणत्याही पदावर राहणार नसल्याचे वाल्हेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले.