शहरातील बँकांतून मोठी रक्कम काढून बाहेर जाणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांना लुटणारी सहा जणांची टोळी गुन्हे शाखेने बुधवारी गजाआड केली. हे सर्व आरोपी अहमदाबाद येथील आहेत. या टोळीच्या म्होरक्याला शहरातील अशाच प्रकारच्या सुमारे ४० गुन्ह्य़ांत यापूर्वी सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर नवी टोळी तयार करून त्याने पुन्हा हेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या नव्या टोळीने शहरातील २० गुन्हे केले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व दागिने मिळून ३८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पंकज जवाहर माचरेकर (वय ३१, रा. कुबेरनगर, छारानगर फ्री कॉलनी, अहमदाबाद, गुजरात) असे या टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण अहमदाबादजवळील मूळ रहिवासी आहेत. शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांतून काढलेली मोठी रक्कम किंवा बँकेच्या लॉकरमधून दागिने घेऊन जाणाऱ्या नागरिकांना ही टोळी लक्ष्य करीत होती.
गुन्हे शाखेचे पथक या आरोपींच्या शोधात होते. निगडी प्राधिकरणातील भेळ चौकात असलेल्या एचडीएफसी बँकेजवळ अशा प्रकारचे गुन्हे करणारी गुजरातमधील टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले. त्यांच्याकडील मोटारीत बॅग लिफ्टींगच्या गुन्ह्य़ातील १२ लाख ५० हजार रुपये, नऊ किलो ७३० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी, ३५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, उपायुक्त राजेश बनसोडे, सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक पोलीस निरीक्षक जािलदर तांदळे, अरुण सुर्वे, हवालदार अशोक भोसले, जितेंद्र अभंगराव, गुनशीलन रंगम, महेंद्र पवार, शशिकांत शिंदे, संजय गवारे आदींनी ही कारवाई केली.
पुण्यात पिंपरी, चिंचवड, निगडी, चतु:शृंगी, स्वारगेट व शिवाजीनगरबरोबरच मुंबई, पनवेल, औरंगाबाद, बीड, अहमदनगर या भागात त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली. माचरेकर याने यापूर्वी अशीच टोळी तयार करून सुमारे ४० गुन्हे केले होते. त्या टोळीलाही पुण्यातच अटक झाली होती. सत्र न्यायालयाने या टोळीला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयात आरोपींना जामीन मिळाला. त्यानंतर माचरेकर याने ही नवी टोळी तयार केली होती.
मोटारीतच मुक्काम अन् शिर्डीत अंघोळ
गुजरातमधील ही टोळी पुण्यात गुन्हे करून पुन्हा त्यांच्या मूळ गावी जात होती. पुण्यात किंवा कोणत्याही ठिकाणी ते लॉजमध्ये राहत नव्हते. त्यांच्याजवळील मोटारीतच ते मुक्काम करीत होते. लुटलेला मालही त्याच मोटारीत ठेवला जात होता. पहाटे शिर्डीला जाऊन तेथील एखाद्या धर्मशाळेत अंघोळ करून ते पुढील प्रवास सुरू करीत होते.

Story img Loader