दाट लोकवस्तीमुळे सोयीचे; कुदळवाडी हक्काचे ठिकाण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहशतवादी कारवायांशी संबंधित तसेच विविध टोळ्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या अनेक सराईत गुन्हेगारांनी सुरक्षित आश्रयासाठी पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्य केल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. चिखलीतील कुदळवाडीचा दाट परिसर म्हणजे अशा फरार गुन्हेगारांचे लपण्याचे हक्काचे ठिकाण असल्याचे उघड गुपित आहे. पोलीस खात्यातील खाबुगिरी, उदासीनता यांसारख्या कारणांमुळे ठोस कारवाई होताना दिसत नाही.

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवडय़ात आकुर्डीतून दोन बांगलादेशी घुसखोरांना पकडले. बांगलादेश सरकारने बंदी घातलेल्या व ‘एबीटी’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित हे घुसखोर आहेत. ‘अल कायदा’ या जागतिक दहशतवादी संघटनेशी ‘एबीटी’चे लागेबांधे आहेत. कित्येक दिवसांपासून या आरोपींचे वास्तव्य पिंपरी-चिंचवड शहरात होते. या घटनेमुळे शहरातील छुप्या गुन्हेगारांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी, अनेक गुन्हेगारी घटनांमधील आरोपी शहरात वास्तव्य करून गेल्याची उदाहरणे आहेत.

पिंपरी-चिंचवड हा दाट लोकवस्तीचा भाग असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगारांकडून आश्रयासाठी या भागाची निवड केली जाते. बांगलादेशातील अशाच एक महिला गुन्हेगाराचे बनावट नोटांचे रॅकेट निगडी पोलिसांनी उघडकीस आणले होते. ‘सिमी’च्या संशयास्पद कार्यकर्त्यांचा शहरात वावर असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. अनेक ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपी येथील प्रस्थापित गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. काही राजकीय मंडळींची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याचा फायदा अशा गुन्हेगारांकडून घेतला जातो. आकुर्डीलगत काळभोरनगर येथे गवळी टोळीचा शूटर कित्येक महिने राहत होता. मात्र, त्याची बित्तमबातमी कोणालाही नव्हती. पोलीस चकमकीत तो मारला गेल्यानंतर याचा उलगडा झाला होता. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या स्फोटातील आरोपी कासारवाडीत दाट लोकवस्ती असलेल्या भागात राहत होता. जर्मन बेकरी स्फोटातील आरोपी कुदळवाडीत राहून गेले होते, हे नंतर तपासात उघड झाले होते. कुठेही दहशतवादी कारवाया झाल्या, की कुदळवाडीकडे लक्ष वेधले जाते. या ठिकाणी नामचीन गुन्हेगारांचे वास्तव्य तसेच ये-जा असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांनाही असते. मात्र, ठोस कारवाई केली जात नाही, याचे गौडबंगाल उमगत नाही. घरमालकांनी जागा

भाडय़ाने देताना संबंधित व्यक्तीची सखोल माहिती ठेवावी तसेच पुरावे तपासावेत, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले

जाते. मात्र, त्याचे गांभीर्य नसल्याने तशी कृती जागामालकांकडून होत नाही. शेजारीपाजारी अनभिज्ञ असतात म्हणून अशा गुन्हेगारांचे फावते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminals lived in the city of pimpri chinchwad