पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट दोनने पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. सराईत गुन्हेगार मुनाफ रियाज पठाण आणि देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफाडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दहशत निर्माण करण्यासाठी दापोडीत ते कमरेला पिस्तूल लावून फिरत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांना दापोडीतील अल्फा लावल कंपनीजवळ सराईत गुंड हे कमरेला पिस्तूल लावून फिरत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली. जितेंद्र कदम यांनी तत्काळ दोन पथके तयार करून सापळा रचून सराईत गुन्हेगार मुनाफ रियाज पठाण आणि देवा उर्फ देविदास बाळासाहेब गालफाडे यांना ताब्यात घेतलं. त्यांची झडते घेतली असता त्यांच्याकडे कमरेला पिस्तुले आढळलीत.
हेही वाचा – नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दोघांचा मृत्यू
हेही वाचा – पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना सिंहगड रस्ता भागात पकडले; चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त
दोन्ही गुन्हेगारांवर भोसरी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, गणेश माने, दिलीप चौधरी, शिवानंद स्वामी, उषा दळे, देवा राऊत, नामदेव कापसे, आतिश कुडके, विपुल जाधव, अजित सानप, शिवाजी मुंडे, उद्धव खेडकर यांच्या टीमने केली.