राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश पुण्यातील अपंग शाळांनी किंवा विशेष मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांनी धुडाकावल्याचेच दिसत आहेत. शहर आणि परिसरातील फक्त १ टक्का अपंग शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याचे समोर येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. अपहरणाचे प्रयत्न, लैंगिक अत्याचाराची प्रकरणे या पाश्र्वभूमीवर शाळांना या सूचना देण्यात आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी जुन्नरमध्ये अपंग विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर अपंग कल्याण विभागानेही शाळांना याबाबत सूचना दिली होती. मात्र, त्यानंतरही अद्याप शाळांनी सीसीटीव्ही बसवण्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे.
पुणे आणि परिसरामध्ये पन्नासहून अधिक अपंग शाळा आहेत. मानसिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी, अंध आणि मूक-बधिर मुलांसाठीच्या शाळा या अधिक आहेत. या तीनही गटातील विद्यार्थ्यांची प्रतिकार करण्याची क्षमता मुळातच कमी असल्यामुळे या विद्यार्थ्यांची सुरक्षा ही अधिक जोखमीची असते. मात्र, शहरातील काही अपवाद वगळता बहुतेक शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. काही शाळांमध्ये पूर्ण वेळ सुरक्षारक्षकही असत नाहीत. त्याचप्रमाणे शाळांच्या आवाराला पक्की भिंत नसल्याचीही तक्रार पालकांनी केली आहे. एकीकडे नियमित शाळांमध्येही अपंग विद्यार्थ्यांसाठी किंवा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. मात्र, अपंग विद्यार्थ्यांसाठीच उभारण्यात आलेल्या शाळांमध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात येत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शहर आणि परिसरातील फक्त ४ ते ५ शाळांनी सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली असल्याचे अपंग कल्याण विभागातील सूत्रांनी सांगितले.
याबाबत एका विशेष विद्यार्थ्यांसाठीच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले, ‘सगळ्याच अपंग शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत असतात. विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण करता यावे, यासाठीचे प्रशिक्षणही आम्ही त्यांना देतो. नियमित शाळांपेक्षा आमच्याकडे विद्यार्थीसंख्या कमी असते. त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रमाणही अपंग शाळांसाठी वेगळे आहे. त्यामुळे शिक्षकच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असतात. मात्र, शासनाकडून अपंग शाळांना वेळेत अनुदान दिले जात नाही. अपंग शाळांचे खर्चही जास्त आहेत. शाळांकडून अपेक्षा फक्त ठेवल्या जातात.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा