पावलस मुगुटमल
पुणे : मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर एका टप्प्यावर ‘ब्रेक मान्सून’ (सलग १० ते १५ दिवस पावसाचा खंड) ही वातावरणीय प्रणाली निर्माण होत असते, मात्र यंदा राज्यात कोणत्याही भागांत अशा प्रकारे पावसाने दीर्घ सुटी घेतली नाही. पावसाने आवश्यक असलेला खंड न दिल्याने त्याचा पिकांच्या पोषणावर काहीसा परिणाम होऊ शकतो, असे अभ्यासकांचे मत आहे. यंदा कमी दाबाच्या पट्टय़ांनी बदललेली दिशा आणि त्यातून पावसाच्या बदललेल्या स्वरूपामुळे राज्यातील धरणांत मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला आहे, मात्र पावसाने आवश्यक असलेली उघडीप दिलेली नाही.
राज्यात जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते, मात्र जुलै, ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आणि आता सप्टेंबरच्या मध्यानंतरही बहुतांश भागात पाऊस सक्रिय आहे. या पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणे लवकर भरली आहेत. सध्या धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. अनेक धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यात सद्य:स्थितीत २६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वच जिल्ह्यांतील पावसाने सरासरी पूर्ण केली असून, आता अतिरिक्त पावसाची नोंद होत आहे.
पावसाच्या प्रमाणाच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक असली, तरी वातावरणीय प्रणालीनुसार मोसमी पावसाच्या हंगामात त्याचा दीर्घ खंडही आवश्यक असतो. मात्र यंदा १० ते १५ दिवसांचा पावसाचा दीर्घ खंड राज्याच्या कोणत्याही भागांत झाला नाही. तुरळक भागांत आठवडाभर खंड पडला असला, तरी आकाशाची स्थिती प्रामुख्याने ढगाळ राहिली. सातत्याने कमी दाबाचे पट्टे किंवा स्थानिक वातावरणातून राज्याच्या विविध भागांत पाऊस झाला.
अशी स्थिती का?
पावसाने यंदा आपले स्वरूपच बदलले. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बहुतांश वेळेला उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे न जाता मध्य भारताकडे वळले. त्यातून महाराष्ट्रात पाऊस झाला. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र आणि बाष्पाचा फायदाही नेहमीप्रमाणे राज्याला मिळाला. मोसमी पावसाची आस उत्तरेकडे सरकली असताना महाराष्ट्रात पावसाचा खंड पडण्याची स्थिती होती, मात्र त्या वेळी स्थानिक परिस्थितीतून राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसाचा दीर्घ खंड पडला नाही.
अभ्यासक म्हणतात..
- पावसाची खंडस्थिती यंदा उद्भवली नाही. हे शेतीसाठी काही प्रमाणात हानिकारक आहे. याबाबत ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, ही स्थिती न उद्भवणे हे यंदाच्या पावसाचे वेगळेपण आहे.
- अखंड पावसामुळे सूर्यप्रकाश, कमी आद्र्रतेचा अभाव, जमिनीचा वाफसा, ऊर्जा उत्सर्जनासह पिकातील तण काढणीस अडथळा आला.
- भरपूर पाऊस होऊनही पिकांची सुदृढता, वेळेत जोमदार पीक वाढीवर त्याचा नकारात्मक परिणाम जाणवतो. केवळ कीड, लष्करआळीच्या आक्रमणास काहीसा प्रतिबंध होऊ शकतो.