शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातवावर जाहीर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सध्या समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या पत्राचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. शिंदे गटाच्या युवा सेनेकडून जंगली महाराज रस्त्यावरील झाशी राणी चौकात पत्राचे फलक लावण्यात आले आहेत.
पत्रातील मजकुराचा फलकामध्ये उल्लेख करण्यात आला असून युवा सेनेकडून लावण्यात आलेले हे फलक चर्चेचा विषय ठरला आहे. बाप मंत्री, कार्ट खासदार, नगरसेवकपदासाठी डोळे लावून बसलेला नातू, अरे त्याला मोठा तर होऊदे, शाळेत तर जाऊदे आत्ताच नगरसेवक काय, सगळं माझ्याचकडे पाहिजे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली होती.
हेही वाचा >>> ‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवली ; १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी
या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. हे पत्र समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहे. दीड वर्षांच्या बाळाला भाषणात खेचणे तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसते का ? उद्धवजी, आठवतंय का तुम्ही काय बोललात ते ? रुद्रांशचा, माझ्या दीड वर्षाच्या मुलाचा उल्लेख केलेला आठवतेय का? त्याचा नगरसेवकपदावर डोळा आहे, असे वक्तव्य तुम्ही केले. ज्या डोळ्यात फक्त आणि फक्त निरासगता भरलेली आहे, ज्याच्या डोळ्यातून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, हे सांगताना तुम्हाला कारीच वाटलं नाही का? अशी विचारणा श्रीकांत शिंदे यांनी केली होती. या पत्रातील सर्व मजकूर फलक स्वरुपात लावण्यात आला आहे.