लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने १४ वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या डिझेल आणि पेट्रोलवरील वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. वापरात नसलेल्या आणि जुन्या अशा एकूण १२० वाहनांचा लिलाव होणार असून या द्वारे महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी नऊ लाख रुपये जमा होणार आहेत.
राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने खरेदीवर भर दिला आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी शहराच्या विविध महत्त्वाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता जुनी झालेली डिझेल आणि पेट्रोलवरची वाहने महापालिकेने लिलावाद्वारे विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा- पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
त्यानुसार महापालिकेने १२२ वाहनांची निविदा काढली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दरात १० टक्के वाढ करून ई लिलाव करण्यात आला. त्यानुसार ९२ लाख ९६ हजार असा २३.६६ टक्के दर प्राप्त झाला. त्यामधील १२२ वाहनांपैकी दोन वाहनांना लघुत्तम दरापेक्षा कमी दर आल्याने ती वाहने वगळून १२० वाहनांची ९२ लाख ९६ हजार रुपये आणि १८ टक्के जीएसटी धरून एक कोटी नऊ लाख ६९ हजार रुपयांना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेतील १२० वाहनांची विक्री करण्यात येणार आहे. त्यापोटी महापालिकेला एक कोटी नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. हे पैसे कोषागरात भरून वाहने बोलीदारांना देण्यास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.