पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मंगळवारी विशेष न्यायालयात केंद्रीय न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे वरिष्ठ अधिकारी नीलेश वाघ यांची बचाव पक्षातर्फे उलटतपासणी घेण्यात आली.डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरणाची विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. डाॅ. दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि डॉ. वीरेंद्र तावडे यांचे मानसशास्त्रीय मूल्यमापन वाघ यांनी केले होते. त्या अनुषंगाने बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी वाघ यांची उलटतपासणी घेतली.
आरोपींचे मूल्यमापन कोणत्या प्रकारे केले, त्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले होते का, मानसशास्त्रीय मूल्यमापनापूर्वी आरोपींची वैद्यकीय तपासणी केली होती का, तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्यावर दबाव टाकला होता का? असे प्रश्न बचाव पक्षाकडून उपस्थित करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले.