एकाच प्रभागातून वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून देण्याची ‘क्रॉस वोटिंग’ची परंपरा आणि प्रभावशील अशा भूमिपुत्रांच्या घराण्यांचे ‘गावकी-भावकी’चे राजकारण असलेल्या चिंचवड गावठाण प्रभागात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच आहे. जातीय समीकरणे येथील निवडणुकीचा मुख्य गाभा राहणार असून ‘खरे ओबीसी आणि खोटे ओबीसी’ हा कळीचा मुद्दा राहणार आहे.

चिंचवड गावठाण, गांधी पेठ, केशवनगर, तानाजीनगर, वेताळनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क, मंगलमूर्ती वाडा, रस्टन कॉलनी, पवनानगर असे विद्यमान आठ नगरसेवकांच्या सध्याच्या प्रभागांमधील क्षेत्र नव्या विस्तृत प्रभागात समाविष्ट आहे. सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी आणि ओबीसी महिला असे आरक्षण आहे. दाट लोकवस्ती व सुशिक्षित वर्गाचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या या प्रभागात वरकरणी भाजपचा प्रभाव दिसत असला तरी राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकदही दुर्लक्षित करता येत नाही. माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, संदीप चिंचवडे, अश्विनी चिंचवडे असे चार नगरसेवक व ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत गावडे यांचा मुलगा विजय गावडे निवडणूक िरगणात असू शकतात. ‘वरून एक आणि आतून एक’ असा पाडापाडीचा खेळ आणि ‘क्रॉस वोटिंग’ हे वैशिष्टय़ आहे. मतदार देखील कोणत्याही एकाच पक्षाला कौल देत नाहीत, हे यापूर्वी स्पष्ट झाले आहे.

सन २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभागात शिवसेनेचे वसंत तेलंगी, भाजपच्या कांता मोंढे, काँग्रेसचे राजू गोलांडे निवडून आले होते. २०१४ मध्ये दोन सदस्यीय प्रभागपध्दतीत गावठाणातून शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे व राष्ट्रवादीचे संदीप चिंचवडे निवडून आले. केशवनगरमधून मनसेचे अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादीच्या अपर्णा डोके निवडून आल्या, असा जर पूर्वइतिहास असेल तर येत्या निवडणुकीत काय होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. चिंचवडे परिवारातील अंतस्थ युती, गावडे व शेडगे यांचा पराभव, इंजिनाची धाव हे गेल्या वेळी चर्चेचे विषय ठरले होते. यावेळी खुल्या तसेच ओबीसी गटात गावकी-भावकीचे राजकारण दिसून येते. भाजपमध्ये सर्वाधिक ओढाताण आहे. खुल्या गटात राजेंद्र गावडे, महेश कुलकर्णी, रवी देशपांडे, अनंत कोऱ्हाळे, विजय गावडे तर ओबीसी गटात शरद बाराहाथे, संदीप चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, प्रशांत अगज्ञान, प्रदीप सायकर, सुरेश भोईर असे दावेदार आहेत. ओबीसी महिला गटात अपर्णा डोके यांच्यासमोर राष्ट्रवादी आणि भाजप असे दोन पर्याय आहेत. त्यांच्यासमोर लढणे आव्हानच आहे. सर्वसाधारण महिला गटात अश्विनी चिंचवडे यांचे आव्हान आहे. कोऱ्हाळे मनसेतून शिवसेनेत गेले आहेत. तर, राजेंद्र गावडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. लोकसभेला ‘बाण’ तर विधानसभेला ‘कमळ’ चाललेल्या या पट्टय़ात कोण कोणाच्या समोर येतो, यावर पालिका निवडणुकीची पुढील गणिते अवलंबून आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

[jwplayer DfBlas1q-1o30kmL6]