पुणे : पुण्यातील बालेवाडी येथे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. परंतु, या कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या कंत्राटी आणि कायमस्वरूपी सफाई कामगार असलेल्या महिलांना घेऊन जाण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या संघटिका सुलभा उबाळे यांनी केला आहे, तसे पुरावे त्यांनी दिले आहेत. शहर अस्वच्छ ठेवून लाडकी बहीण योजनेला गर्दी केली आहे. असे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा सध्या बोलबाला दिसत आहे. महायुतीच्या पक्षांकडून याबाबत घरोघरी सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांच्या बँक खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर जनसन्मान यात्रेत लाडकी बहीण योजनेचे गोडवे गात आहेत. महिलांना या योजनेबद्दल पटवून सांगितलं जात आहे. आज पुण्यातील बालेवाडी महायुती सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला यासाठी हजारो महिलांची गर्दी झाली आहे. मात्र, या गर्दीवरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या महिलांना गर्दी करण्यासाठी सक्ती केली का? असा प्रश्न विचारला जात आहे. असं असताना पिंपरी- चिंचवड मधून महानगरपालिकेच्या महिला सफाई कामगारांना सक्ती करण्यात आल्याच्या आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या संघटिका सुलभा उबाळे यांनी केला आहे.
आणखी वाचा-Eknath Shinde : “…तर गाठ माझ्याशी आहे”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
कंत्राटी आणि कायमस्वरूपी असलेल्या महिला सफाई कामगारांना आज पीएमपी बसने बालेवाडीत लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी घेऊन जाण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी अशा प्रकारे नामुष्की विरोधकांवर ओढवल्याचं त्यांनी सांगितलं. अक्षरशः ग्रामसेवक ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत सर्वजण लाडकी बहीण योजनेचा गोडवा गाताना दिसत आहेत. एकीकडे पिंपरी- चिंचवड शहरात साथीचे रोग पसरत आहेत. मात्र, आज शहरात महिला सफाई कामगार नसल्याने स्वच्छता झाली नाही. याकडे आयुक्तही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाचा शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला आहे.