लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : देखावे पाहण्यासाठी मध्यभागात शुक्रवारी रात्री मोठी गर्दी झाली. सलग सुट्यांमुळे अनेकांनी सहकुटुंब देखावे पाहण्याचा आनंद लुटला. मध्यरात्रीपर्यंत मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (१७ सप्टेंबर) होणार आहे. शनिवार आणि रविवारच्या सुटीला सोमवारी (१६ सप्टेंबर) ईद- ए- मिलादची सुटी जोडून आल्याने शुक्रवारी सायंकाळनंतर मध्यभागात देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सलग सुट्यांमुळे शहर, तसेच उपनगरातील नागरिकांनी सहकुटुंब देखावे पाहण्याठी गर्दी केली होती. मध्यभागातील गल्ली-बोळातून चालणे देखील अवघड झाले होते. अनेकांनी गर्दी मोटारीत आणल्याने कोंडीत भर पडली. वाढती गर्दी आणि वाहनांमुळे चौकाचौकात शुक्रवारी रात्री कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली.
आणखी वाचा-असा देखावा पाहिलाच नसेल! १५ फूट ऊंच बॅट, वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि भल्या मोठ्या चेंडूत गणपती बाप्पा
छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यासह मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळनंतर वाहतुकीस बंद करण्यात आले. मानाच्या मंडळांच्या ‘श्रीं’ चे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. शनिपार मंडळाने साकारलेले वृंदावन, सदाशिव पेठेतील नवजवान मंडळाने साकारलेला शिवपार्वती विवाह सोहळा, छत्रपती राजाराम मंडळाने साकारलेला दुर्ग्याणी मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.
बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मंडळ, चिमण्या गणपती मंडळ, वंदेमातरम संघ, दिग्विजय मंडळाने साकारलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी झाली होती. मध्यरात्रीपर्यंत मध्यभागातील प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळात गर्दी झाली होती. खजिना विहिर मंडळ, साने गुरुजी मित्र मंडळ, अकरा मारुती चौक मंडळ, सेवा मित्र मंडळाने साकारलेले देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दीचे नियोजन करण्यासाठी चौकाचौकात पोलीस नेमण्यात आले होते. अनेकांनी गर्दीत वाहने आणल्याने कोंडीत भर पडली.
मोटारींमुळे कोंडीत भर
गणेशोत्सवात मध्यभागातील विविध मंडळांसमोर ढोल-ताशा पथकांकडून स्थिर वादन सादर करण्यात आले. सायंकाळनंतर स्थिर वादन सुरू झाल्यानंतर मध्यभागातील कोंडीत भर पडली. देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना कोंडीत अडकून पडावे लागले. अनेकजण मोटारी घेऊन मध्यभागात आल्याने कोंडीत भर पडली. वाहतूक नियोजन करताना पोलिसांची दमछाक झाली. मध्यरात्रीपर्यंत मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.