पुणे : नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. शहर, तसेच उपनगरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आल्याने छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता तसेच परिसरातील गल्ली बोळात कोंडी झाली.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहर, उपनगर तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. छत्रपती शिवाजी रस्त्यासह लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता. बाजीराव रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दर्शनासाठी आलेल्या अनेकांनी मोटारी नदीपात्रातील रस्त्यावर लावल्याने नदीपात्रातील रस्त्यावरील मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. मध्यभागातील गल्ली बोळात अनेकांनी दुचाकी वाहने बेशिस्तपणे लावल्याने कोंडी झाली होती. भाविकांची गर्दी रात्रीपर्यंत होती. शिवाजी रस्ता परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.
हेही वाचा >>>बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने नूतन वर्षारंभानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या परिसरात रंगावलीच्या पायघड्या, तसेच पुष्प सजावट करण्यात आली होती. सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सारसबाग येथील सिद्धीविनायक मंदिर, तसेच शहरातील विविध मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.