पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू असून वर्षाविहारासाठी मुळशीतील ताम्हिणी घाट, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण तसेच लोणावळ्यातील भुशी धरण, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. रविवारी भुशी धरण परिसरात पुणे-मुंबईतील पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. लोणावळा शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने ठिकठिकाणी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
लोणावळा, खंडाळा परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून भुशी धरण तुडुंब भरले आहे. भुशी धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने पायऱ्यांवर बसून वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. रविवारी (१० जुलै) भुशी धरण परिसरात पुणे-मुंबईतील पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून आले होते. त्यामुळे मोटारींच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी मोटारी थोड्या लांब लावून चालत जाण्यास प्राधान्य दिले. करोनाच्या संसर्गामुळे गेले दोन वर्ष पर्यटनबंदी होती. त्यामुळे भुशी धरण परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दुकाने थाटता आली नव्हती.
PHOTOS : वर्षाविहाराचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी
करोना निर्बंध शिथिल केल्यानंतर वर्षाविहारासाठी गेल्या आठवड्यापासून पर्यटकांची गर्दी सुरू झाली आहे शनिवारी (९ जुलै) रात्रीपासून लोणावळा परिसरात पावसाचा जोर कमी झाली आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने लोणावळा शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. लायन्स पॅाईंट परिसरात धुक्याची चादर पसरली असून पर्यटकांची लायन्स पाॅईंट परिसरात गर्दी झाली होती.
निसरड्या वाटा धोकादायक –
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट, जुन्नर परिसरातील माळशेज घाट तसेच लोणावळा, खंडाळा परिसरात वर्षाविहारासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मावळातील लोहगड, विसापूर भागात वर्षाविहारासाठी पर्यटक जातात. गड-किल्ल्यांवरील वाटा निसरड्या झाल्या असून पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी ताम्हिणी घाट, खडकवासला धरण, सिंहगड, माळशेज घाट परिसरात परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती.
चौकट लोणावळ्यात कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग –
शनिवार आणि रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळा परिसरात येतात. पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे गरजेचे आहे. लोणावळा शहर परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी दाखल झाले होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत. पर्यटकांना वाहतूक तसेच पर्यायी मार्गाची माहिती देण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या मोटारचालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितले.