रस्त्यावर फुटपाथवर अचानकच उगवलेल्या नव्या टपऱ्या, रस्त्याच्या मध्येच आलेला धोकादायक खड्डा, बांधकामांच्या ठिकाणी डबक्यात पाणी साठून झालेले डास, ‘माननीयां’च्या वाढदिवसांच्या निमित्ताने चौकाचौकात झालेली फ्लेक्स-बॅनर्सची गर्दी, वाटेल तिथे जमा होणारे कचऱ्याचे ढीग.. कोणत्याही सजग नागरिकाला अस्वस्थ करणाऱ्या या गोष्टी. या समस्या पालिकेपर्यंत पोहोचवाव्या तरी का हा दुसरा प्रश्न. नेटवरील सहज उपलब्ध असलेल्या काही ‘ओपन सोर्स’ प्रोग्रॅम्सचा वापर करून आजवर अनुत्तरित राहिलेल्या या प्रश्नांवर इंटरनेटच्या साहाय्याने उत्तर शोधण्याची कल्पना अभय कुलकर्णी यांनी मांडली आहे.
मूळचे अहमदनगरचे असलेले आणि सध्या पुण्यात राहणारे कुलकर्णी हे ‘प्रॅक्सिस मॅनेजमेंट कन्सल्टिंग’ या संस्थेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी मांडलेल्या ‘क्राऊड सोर्सिग’च्या कल्पनेनुसार नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील पालिकेशी संबंधित अडचणींची माहिती सहज भरता येईल असे इंटरनेटवर चालणारे पोर्टल तयार करता येणार आहे. या पोर्टलला ई-मेल करून किंवा पोर्टलच्या संकेतस्थळावर दिलेल्या अर्जात माहिती भरून नागरिक त्यांना खटकणाऱ्या गोष्टींची माहिती पालिकेपर्यंत अगदी सूक्ष्म तपशिलांसह पोहोचवू शकतील. संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याबरोबर माहितीशी संबंधित जागा किंवा ठिकाण (उदा. कोणत्या रस्त्यावर नेमका कुठे खड्डा आहे / कोणत्या भागात नव्याने अतिक्रमणे झाली आहेत ती जागा) शहराच्या नकाशावर अचूकपणे अधोरेखित करता येईल, अगदी त्या जागेचा फोटोही काढून पोर्टलवर टाकता येईल. ई-मेल किंवा अर्ज भरण्याइतका वेळ नसल्यास अगदी एसएमएस पाठवून किंवा ट्विटरवर विशिष्ट ‘हॅशटॅग’ वापरून देखील माहिती देता येईल. नुसती माहिती एकत्र करणेच नव्हे तर त्या माहितीवर प्रक्रिया करून संभाव्य धोक्यांची माहिती पुन्हा नागरिकांना देण्यासाठी या यंत्रणेवरून ‘अर्लट’ देता येतील. नागरिकांकडून गोळा होणाऱ्या माहितीच्या व्यवस्थापनासाठी मात्र मनुष्यबळाची आवश्यकता लागणार असून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कुलकर्णी सध्या भांडवलाच्या शोधात आहेत. त्यांच्याशी संपर्क साधू इच्छिणाऱ्यांसाठी त्यांचा ई-मेल पत्ता- abhay.kulkarni@praxis.org.in

‘अशीच यंत्रणा नेपाळमधील भूकंपाच्या वेळी वापरण्यात आली होती. ‘क्राऊड सोर्सिग’मधून गोळा झालेली माहिती नागरिकांनीच एकत्र केलेली असते आणि ती कोणत्याही सामान्य नागरिकाला पाहता येऊ शकते. आपत्ती व्यवस्थापनासाठी अशा यंत्रणेचा उपयोग होतोच, पण दैनंदिन जीवनातील पालिकेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठीही वापरता येईल’
– अभय कुलकर्णी, प्रॅक्सिस मॅनेजमेंट कन्सल्टिंग

Story img Loader