पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) यंदा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी ओएमआर उत्तरपत्रिका असलेली परीक्षा होणार असून, प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. सीटीईटीसाठी २७ एप्रिल ते २६ मे या कालावधीत अर्ज भरून घेण्यात आले. सीटीईटी ऑगस्ट – २०२३ परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांकडून ऑनलाइन परीक्षेसाठी शहरांची निवड केली होती.

मात्र, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार शहरात बदल करण्यात आले आहेत. उमेदवारांनी प्रवेश अर्जात दिलेल्या त्यांच्या पत्त्यानुसार नजीकच्या शहरातील परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आले आहे. उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर त्यांना दिलेल्या शहराचा उल्लेख करण्यात आला असून, उमेदवारांना दिलेल्या परीक्षा केंद्रात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवेशपत्र  https://ctet.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.