पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीच्या (सीटीईटी) तारखांमध्ये बदल केला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार डिसेंबर सत्रातील सीटीईटी परीक्षा १ डिसेंबर रोजी होणार होती. आता ही परीक्षा १५ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.
सीबीएसईने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. देशभरातील शासकीय, खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी सीटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जुलै आणि डिसेंबर अशी वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते. त्यानुसार डिसेंबरच्या सत्राची परीक्षा १ डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता प्रशासकीय कारणांमुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच एखाद्या शहरात उमेदवारांची संख्या जास्त असल्यास, परीक्षा १४ डिसेंबर रोजीही घेतली जाऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जुलैच्या सत्राच्या परीक्षेनंतर सीबीएसईने डिसेंबर सत्रासाठी परीक्षा केंद्रांची संख्या १८४ वरून १३६ पर्यंत कमी केली आहे. परीक्षा सकाळी ९.३० ते १२, दुपारी २.३० ते ५ अशा दोन सत्रांत घेण्यात येणार आहे.
हेही वाचा – पोलीस चौकीत पोलीस शिपायाला शिवीगाळ; बहीण-भाऊ अटकेत
सीटीईटीच्या डिसेंबर सत्रासाठीच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबर आहे. अधिक माहिती https://ctet.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.