पुणे: राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) देशभरातील विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (सीयूईटी-पीजी) ही परीक्षा ११ ते २८ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सीयूईटी-पीजी परीक्षेच्या नोंदणीबाबतची माहिती एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. विद्यार्थ्यांना देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे सोयीचे होण्यासाठी सीयूईटी-पीजी ही संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी एनटीएकडे सोपवण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरातील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
हेही वाचा… कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा ६ जानेवारीला
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २४ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर २५ जानेवारीपर्यंत शुल्क भरता येणार आहे. ७ मार्च रोजी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रवेश परीक्षेसाठीची पात्रता, शुल्क आणि अन्य माहिती https://nta.ac.in/, https://pgcuet.samarth.ac.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.