मैदान क्रीडाविषयक उपक्रमांसाठी राखीव ठेवल्यामुळे निर्णय

अभिजात संगीतामध्ये जगभरात नावाजल्या गेलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’पाठोपाठ शहरातील अन्य महोत्सवांचा डेरा दुसरीकडे हलविण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचे मैदान यंदापासून केवळ क्रीडाविषयक उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळे सवाई महोत्सवानंतर होणाऱ्या तीन महोत्सवांच्या आयोजकांना स्थळ बदलण्यास भाग पडले आहे.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचे मैदान आणि सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे तीन दशकांपासून अनोखे समीकरण झाले होते.  शहराच्या मध्यवर्ती असलेले हे ठिकाण रसिकांनाही सोयीचे झाले होते. मात्र, यंदाच्या वर्षी महोत्सवाची तयारी सुरू झालेली असताना प्रशालेचे मैदान देता येणार नसल्याचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महोत्सवाची आयोजक संस्था असलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाला कळविले. संस्थेच्या शाळांची मैदाने केवळ क्रीडाविषयक उपक्रमांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संस्थेने मंडळाला पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या दोन दिवसांत महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल हे यंदाच्या महोत्सवाचे स्थान निश्चित केले.

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’नंतर स्वरझंकार महोत्सव, वसंतोत्सव आणि तालचक्र महोत्सव हे तीन महोत्सव रमणबाग प्रशालेच्या मैदानावरच होतात. या सर्व महोत्सवांसाठी मैदानाची दारे बंद झाल्यामुळे आयोजकांना डेरा दुसरीकडे हलवावा लागला आहे. दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात व्हायोलिन अ‍ॅकॅडमीतर्फे स्वरझंकार महोत्सव होत असतो. गेली नऊ वर्षे रमणबाग प्रशालेच्या मैदानावर झालेला हा महोत्सव यंदा पौड रस्त्यावरील एका शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी दिली. संगीताचे रसिक कोथरूड भागात वास्तव्यास असल्याने महोत्सवाचे स्थळ त्यांच्यासाठी सोयीचे ठरेल, याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले.

ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे ‘वसंतोत्सवा’चे आयोजन करतात. नावीन्यपूर्ण संगीत श्रवणाचा आनंद देणारा हा महोत्सव रमणबाग प्रशालेच्याच मैदानावर होत होता. प्रसिद्ध तबलावादक विजय घाटे हे ‘तालचक्र महोत्सवा’चे आयोजन करतात. विविध तालवाद्यांचा आविष्कार असलेला हा महोत्सव पाच वर्षे रमणबागेच्या मैदानावर, तर एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथे झाला होता. यंदाच्या महोत्सवाची जुळवाजुळव सुरू आहे, मात्र महोत्सवासाठी स्थळ बदलावे लागणार आहे, असे घाटे यांनी सांगितले.

 

Story img Loader