चापूनचोपून नेसलेली नऊवारी, कपाळाला लावलेला बुक्का, गळ्यामध्ये असलेल्या टाळांचा नाद करीत रंगलेले कीर्तन… मराठी आणि संस्कृतमध्ये पद गात त्या पदांचे विवेचन करणारे आख्यान इंग्रजीमध्ये.. महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तनाच्या परंपरेमध्ये हा अभिनव प्रयोग करणाऱ्या कीर्तनकार होत्या डॉ. अ‍ॅना शूल्ट्झ.. केवळ कीर्तन करून त्या थांबलेल्या नाहीत, तर त्यांनी कीर्तन या विषयामध्येच पीएच. डी. संपादन केली आहे.
 टाळ-मृदंगाच्या गजरात आळंदी-देहू येथून विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीला जाणारी वारी, राष्ट्रपुरुष आणि दैवतांच्या चरित्राचे आख्यान कथन करीत केले जाणारे कीर्तन ही महाराष्ट्राची आगळीवेगळी वैशिष्टय़े आहेत. या राष्ट्रीय कीर्तन परंपरेचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील अ‍ॅना शूल्ट्झ या भारतामध्ये आल्या. मूळच्या न्यूयॉर्क येथील अ‍ॅना या ‘इंडियन स्टडीज’ म्हणजेच ‘भारतीय संस्कृती’ या विषयाचे अध्यापन करीत आहेत.  महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्येही विशेषत्वाने पुण्यामध्ये येऊन त्यांनी कीर्तन या विषयाचा सखोल अभ्यास करून ‘सिंिगग ए हिंदूू नेशन – मराठी डिव्होशनल परफॉर्मन्स अँड नॅशनॅलिझम’ या विषयावर प्रबंध सादर करून पीएच. डी. संपादन केली. सध्या त्या ज्यू कीर्तन परंपरेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत.
कीर्तन विषयाचा अभ्यास करण्यासाठी अ‍ॅना तीन वर्षांपूर्वी पुण्यामध्ये आल्या होत्या. हरिदासी, नारदीय आणि वारकरी कीर्तन परंपरेची वैशिष्टय़े आणि सादरीकरणातील वेगळेपण याविषयी अ‍ॅना यांनी त्यांच्या प्रबंधामध्ये पूर्वाश्रमी कीर्तनकार असलेले करवीरपीठाचे माजी शंकराचार्य आणि राष्ट्रीय कीर्तनकार गोिवदस्वामी आफळे यांच्या कीर्तन सादरीकरणाविषयी माहिती घेतली. गोिवंदस्वामी आफळे यांची कीर्तन परंपरा पुढे नेणारे चारुदत्त आफळे, ज्येष्ठ कीर्तनकार वासुदेवराव कोल्हटकर यांच्यापासून ते युवा पिढीतील श्रेयस बडवे या युवा कीर्तनकाराच्या मुलाखतींचा या प्रबंधामध्ये समावेश केला आहे. कीर्तन विषयावर डॉक्टरेट संपादन केलेल्या अ‍ॅना शूल्ट्झ यांचा श्री हरिकीर्तनोत्तेजक सभेतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला होता. या सत्काराला उत्तर म्हणून अ‍ॅना यांनी इंग्रजीमध्ये कीर्तन सादर केले. मराठी आणि संस्कृतमध्ये पदे गात त्यांनी आख्यान इंग्रजीमध्ये केले. या कीर्तनाचे साक्षीदार असलेले भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांनी ही माहिती दिली.
डॉ. अ‍ॅना शूल्ट्झ या सध्या ज्यू कीर्तन परंपरेचा अभ्यास करीत आहेत. बायबलमधील तत्त्वज्ञान हा ज्यू कीर्तनकारांच्या आखान्याचा विषय असतो. या परंपरेनुसार कीर्तन करणारे काही कीर्तनकार पुणे आणि मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाखती आणि कीर्तनाचे रेकॉिर्डंग करून ज्यू कीर्तन परंपरेचा अभ्यास करण्यासाठी त्या महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, असेही मंजूळ यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Culture ana schultz english indian studies