सिंहगडावरील पाण्याचे टाके, तान्हाजी कडा आणि कोंढणपूर-रांझे परिसरातील डोंगररांगेत खडकाच्या पृष्ठभागावर प्रागैतिहासिक काळातील ‘कप मार्क’, शिल्पचित्रे आढळून आले आहेत. खडकावरील रेखाटनांमध्ये कप मार्क हे सुरुवातीच्या काळातील मानले जात असल्याने सिंहगडाच्या परिसरात मानवाचे अस्तित्व प्रागैतिहासिक काळापासून असल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या टप्प्यात ही अमूर्त रेखाटने खडकांवर करण्यात आली याचा अभ्यास करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> पुणे: पत्नीच्या त्रासामुळे पतीची गळफास घेऊन आत्महत्या
संशोधक डॉ. नंदकिशोर मते यांनी संशोधनाबाबत माहिती दिली. डेक्कन कॉलेजचे डॉ. पी. डी. साबळे, संशोधक सचिन पाटील उपस्थित होते. सिंहगडाचा उपलब्ध इतिहास हा १४व्या शतकापर्यंत मागे जातो. मात्र सातवाहन काळाच्या आधी सिंहगडाचे तटबंदी युक्त असे संरक्षणात्मक स्वरूप येण्याअगोदरही या परिसरात प्राचीन मानवाचा वावर असावा, असे गृहीतक होते. त्यादृष्टीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. तसे पुरावे सिंहगड परिसरात मिळाले. खडकावरील रेखाटनामध्ये व्होल्व्हा, कप मार्क, केंद्रित वर्तुळे असे रेखाटन निदर्शनास आले. या रेखाटनांचा अभ्यास केला असता अशा आकृती प्राचीन काळातील मानवी उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा दर्शवत असल्याचे आढळल्याचे डॉ. मते यांनी सांगितले.
हेही वाचा >>> औंध जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
रॉक आर्ट ही संकल्पना भारतीय उपखंडामध्ये बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. अमूर्त स्वरूपातील शिल्पांचे साम्य असणाऱ्या आकृत्या युरोपीय प्रदेशातील नॉर्थ अंबरलँड, स्कॉटलंड, स्वीडन, ग्रेट ब्रिटनचा उत्तरेकडील भागात पाहायला मिळतात. तसेच या विषयावर जगभरात अनेक ठिकाणी संशोधन झाल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले. दख्खनच्या पठारावरील प्राचीन व्यापारी मार्गाच्या आसपासच्या बसाॅल्ट खडकावर अशा आकृत्या कोरण्यासाठी लहान, टोकदार दगडी हत्यारांचा वापर केला गेला. अधिवासाच्या काळात मानवाने मनातील संकल्पना व्यक्त करण्यासाठी ही रेखाटने कोरली असावीत. त्यामुळे हा कालखंड विविध ठिकाणी मध्याश्म युगापासून सुरू होऊन महापाषाण युगापर्यंत त्यात भर पडत गेल्याचेे दिसते, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.