दत्ता जाधव

पुणे : अतिवृष्टी, मान्सूनोत्तर पाऊस, अचानक वाढलेल्या थंडीचा परिणाम होऊन यंदा राज्यात बेदाणा उत्पादनात दहा ते अकरा टक्के घट झाली आहे. मागील वर्षी सरासरी १ लाख ८० हजार टन बेदाणा उत्पादन झाले होते, यंदा ते १ लाख ६० हजार टनांवर येण्याची शक्यता आहे.  यंदा बेदाणा उत्पादक अडचणीत आले आहेत. नैसर्गिक आपत्तींचा फटका बसल्यामुळे द्राक्षाचे उत्पादन कमी निघाले, बेदाण्याचा उताराही कमीच राहिला, शिवाय दरातही फारशी सुधारणा नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. बेदाणा तत्काळ विकून आपली देणी भागविण्याकडे कल असल्याने दर दबावाखाली आहेत.

राज्यात सांगली, सोलापूर, नाशिक, पुणे जिल्ह्यांत बेदाणा उत्पादन होते.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विजयपूर आाणि बेळगाव जिल्ह्यांत होणारे उत्पादनही राज्यातच गृहीत धरले जाते. सरासरी १ लाख ५० हजार टन बेदाणा उत्पादित होतो. मागील वर्षी करोनामुळे बाजारात द्राक्ष विक्री झाली नाही, त्यामुळे उत्पादन १ लाख ८० हजार टनांवर गेले होते. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचा तडाखा बसला, त्यामुळे बाजारात विक्री होणाऱ्या आणि निर्यातक्षम द्राक्षांचा दर्जा घसरला. ही द्राक्षे विक्री होत नसल्याने आणि पुरेसा दर मिळत नसल्याने नाइलाजाने शेतकऱ्यांनी बेदाणा केला. मात्र, हा बेदाणा दर्जेदार झाला नाही. द्राक्ष मण्यात साखरेचे प्रमाण कमी असल्याने उतारा घटला आणि दावणीसह अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अपेक्षित रंगही आला नाही. त्यामुळे दरही चांगली मिळाला नाही.अखेरच्या टप्प्यात म्हणजे मार्च महिन्यांत तयार झालेला बेदाणा चांगल्या दर्जाचा आहे. खास बेदाण्यासाठी तयार केलेल्या द्राक्षांचा बेदाणा केल्यामुळे हा बेदाणा दर्जेदार झाला आहे. एक नंबर दर्जा असलेला बेदाणा १८० ते २२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. दोन नंबर दर्जा असलेला बेदाणा १५०-१७० रुपयाने विक्री होत आहे.

यंदा अवकाळी, अतिवृष्टीचा फटका हंगामाला बसला. बेदाणा उत्पादन दर्जेदार झाले आहे. शिवाय निर्मिती खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेतकरी लोकांची देणी देण्यासाठी मिळेल त्या दराने बेदाणा विक्री करीत आहेत. त्यामुळे दर दबावाखाली आहेत.

-प्रशांत जाधव, बेदाणा उत्पादक (गव्हाण, ता. तासगाव)

बेदाणा हंगाम संपला आहे. अपवादात्मक काही ठिकाणी बेदाणा निर्मिती सुरू आहे, पण ती किरकोळ आहे. यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर ठरला नाही. उत्पादन घटले, दरातही तोटा सहन करावा लागला.

– शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

द्राक्ष उताऱ्यासंबंधी..

सरासरी एक हजार पेटी (४००० किलो द्राक्षे) द्राक्षांपासून १००० किलो बेदाणा तयार होतो. ही सरासरी आल्यास उतारा चांगला पडला, असे समजले जाते. द्राक्षात साखर चांगली भरल्यास आणि द्राक्ष रोगमुक्त असल्यास उतारा चांगला राहतो. उतारा कमी आल्यास बेदाणा निर्मिती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत नाही.