पवार काका-पुतण्याचे प्रभावक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करण्यास शिवसेना सज्ज असून, आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे शुक्रवारी पुण्यात पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. कडवे शिवसैनिक, हक्काचे मतदार असताना व जनतेच्या प्रश्नांसह विविध विषयांवर सातत्याने आंदोलने करूनही घरभेदीपणा व गटबाजीचा शाप असल्याने शिवसेनेला अपेक्षित यश मिळत नसून त्याकडे गांभीर्याने पाहिले जावे, अशी शिवसैनिकांची भावना आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्य़ात शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव व मावळातून गजानन बाबर यांनी बाजी मारल्याचा राष्ट्रवादीला प्रचंड धक्का बसला होता. विधानसभा निवडणुकीतही पुरंदरमधून विजय शिवतरे, कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे व हडपसरमधून महादेव बाबर निवडून आले. आगामी काळात दोन्ही खासदारकी कायम ठेवून विधानसभेत अधिक जागाजिंकण्याचे शिवसेनेचे नियोजन आहे. त्याची व्यूहरचना करण्यासाठी ठाकरेंनी वैयक्तिक लक्ष दिले असून पदाधिकाऱ्यांशी संवाद, हा त्याचाच भाग आहे. शुक्रवारी पुणे व मावळ लोकसभेतील पदाधिकाऱ्यांशी तर शिरूर व बारामतीच्या पदाधिकाऱ्यांशी ते जूनमध्ये स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत.
एकाच पक्षात असूनही दोन्ही खासदारांची वाटचाल स्वतंत्र राहिली असून त्यांच्यातील ‘मतभेद’ हा शिवसैनिकांच्या दृष्टीने अडचणीचा विषय आहे. शिवसेनेत स्थानिक पातळीवर सर्वमान्य असे नेतृत्व नाही. जिल्ह्य़ात दोन संपर्कप्रमुख व चार जिल्हाप्रमुख आहेत, त्यांच्यात समन्वय नाही. आंदोलने होतात, पत्रकबाजी होते, त्याचा पाठपुरावा होत नाही. संघटनात्मक काम विस्कळीत आहे. सव्वा वर्षे झाली पुण्यात शहरप्रमुख नाही, पिंपरीचा शहरप्रमुख कागदावरच आहे, अशा भावना शिवसैनिकांमध्ये आहे. राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता असली तरी पिंपरीत शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र, स्थानिक नेत्यांची पराकोटीची गटबाजी व गद्दारीच्या प्रवृत्तीने पक्षाला पिंपरीत अपेक्षित यश कधीच मिळाले नाही. दीड वर्षांपूर्वी भोसरीत आढळरावांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या ठाकरे यांनी, गटबाजीला उद्देशून चांगलेच फटकारे दिले होते. लढणार असाल तरजिंकण्यासाठी लढा, प्रतिस्पध्र्याशी संघर्ष करण्याऐवजी साटेलोटे करण्याचा नालायकपणा केल्यास कानपटात देईन. इकडे जाऊ अन् तिकडे जाऊ, अशी भाषा करणाऱ्यांनी आताच चालते व्हा. गटबाजीचे राजकारण थांबवा. आपापसात भांडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांना पाणी पाजा. दोन्ही काँग्रेसवाले पाच वर्षे एकमेकांशी भांडतात आणि निवडणुकीत एकत्र येतात. आपण पाच वर्षे एकत्रितपणे जनतेच्या प्रश्नांसाठी भांडतो, आंदोलन करतो आणि ऐन निवडणुकांच्या वेळी एकमेकांशी हेवेदावे करीत बसतो, याकडे लक्ष वेधून यापुढे अशा चुका करू नका, असे ठाकरेंनी बजावले होते. मात्र, त्यानंतरही पिंपरी शिवसेनेतील वातावरण बदलले नाही. त्यामुळे निवडणुकीची व्यूहरचना करताना पक्षाच्या जीवावर मोठे झालेल्या मात्र पक्षालाच मातीत घालण्याचे राजकारण करणाऱ्या स्वंयघोषित नेत्यांना आवर घालण्याचे काम ठाकरे यांना करावे लागणार असल्याची शिवसैनिकांमध्ये भावना आहे.

Story img Loader