ज्येष्ठ नागरिकाच्या ठेवीसह नुकसान भरपाई देण्याचे आदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वारजे भागातील ज्येष्ठ नागरिकाकडून घेतलेली ठेव मुदत संपल्यानंतरही परत न करणाऱ्या बाणेर येथील पॅनकार्ड क्लबला ग्राहक मंचाकडून दणका देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख सहा हजारांची रक्कम, तसेच पंचवीस हजार रूपयांची नुकसान भरपाई सहा आठवडय़ांच्या आत परत करण्याचे आदेश ग्राहक मंचाकडून देण्यात आले.

वारजे भागातील रहिवासी दत्तात्रय गायकवाड यांनी याबाबत पॅनकार्ड क्लब विरोधात ग्राहक मंचाचे अध्यक्ष वाय. डी. शिंदे आणि सदस्य क्षितिजा कुलकर्णी यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. पॅनकार्ड क्लबने गायकवाड यांना गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा देऊ, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार १२ जून २०१४ रोजी गायकवाड यांनी पॅनकार्ड क्लबच्या रिलॅक्स हॉलिडे या योजनेत ३ वर्ष ३ महिने सेवा घेतली होती. त्यासाठी गायकवाड यांनी पॅनकार्ड क्लबकडे ३ लाख ८२० रूपये ठेव जमा केली होती. मुदत संपल्यानंतर गायकवाड यांनी हॉटेलची सेवा न वापरल्यास प्रतिरात्र १२९९ रूपये परत देण्याचे कबूल करण्यात आले होते. मुदत  संपल्यानंतरही पॅनकार्ड क्लबने गायकवाड यांना रक्कम परत केली नाही. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीकडे तक्रार दाखल केली होती.

समितीकडून पॅनकार्ड क्लबला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनसुद्धा पॅनकार्ड क्लबकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. गायकवाड यांनी अ‍ॅड. महेंद्र दलालकर यांच्या मार्फत ग्राहक मंचाचा दावा दाखल केला होता. या दाव्यावर नुकतीच सुनावणी झाली. ग्राहक मंचाचे अध्यक्ष शिंदे आणि सदस्य कुलकर्णी यांनी गायकवाड यांना ३ लाख ६०० रूपये, तसेच नुकसान भरपाईपोटी २५ हजार रूपये सहा आठवडय़ांच्या आत परत करण्याचे आदेश पॅनकार्ड क्लबला दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customer forum hits pancard club
Show comments