पुणे : घरांच्या किमती वाढत असतानाही ग्राहकांना मोठे घरच हवे असल्याचे नुकत्याच झालेल्या एका पाहणीत आढळून आले आहे. देशातील सात महानगरांमध्ये गेल्या पाच वर्षांत घरांच्या सरासरी आकारमानात ३२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दिल्लीत ही वाढ सर्वाधिक ९६ टक्के, तर मुंबईत सर्वांत कमी पाच टक्के आहे. ग्राहकांचा कल मोठ्या घरांकडे असल्याने विकासकही अशाच घरांच्या पुरवठ्यावर भर देत आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत परवडणाऱ्या घरांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील गृहनिर्माण क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात मुंबई, पुण्यासह दिल्ली, कोलकता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, देशात २०१९ च्या पहिल्या सहामाहीत घरांचा आकार ११४५ चौरस फूट होता. तो २०२४ च्या पहिल्या सहामाहीत ३२ टक्क्यांनी वाढून १५१३ चौरस फुटांवर पोहोचला. दिल्लीत पाच वर्षांत घरांचा सरासरी आकार १२५० चौरस फुटांवरून ९६ टक्क्यांनी वाढून २४५० चौरस फुटांवर गेला.

आणखी वाचा-शिक्षक भरतीमध्ये आरक्षित गटातील उमेदवारांना कशी मिळणार संधी? शिक्षण विभागाने दिली माहिती…

दिल्लीत नवीन आलिशान घरांचा पुरवठा वाढला आहे. मुंबईचा विचार करता घरांचा आकार फारसा वाढलेला नाही. मुंबईत गेल्या पाच वर्षांत घरांचा सरासरी आकार ७८४ चौरस फुटांवरून ५ टक्क्यांनी वाढून ८२५ चौरस फूट झाला आहे. मुंबईत केवळ २०२० मध्ये घरांचा आकार २१ टक्क्यांनी वाढला होता. यंदा पहिल्या सहामाहीत घरांचा सरासरी आकार हैदराबादमध्ये २०१० चौरस फुटांवर पोहोचला आहे. चेन्नई आणि बंगुळुरूमध्ये तो अनुक्रमे १४५० चौरस फूट आणि १६३० चौरस फूट आहे. याच वेळी कोलकत्यात तो ११२५ चौरस फूट आणि पुण्यात ११०३ चौरस फूट आहे, अशी माहिती अनारॉक ग्रुपचे उपाध्यक्ष संतोष कुमार यांनी दिली.

करोना संकटानंतर मोठ्या घरांना पसंती

करोना संकटावेळी घरून काम करणे वाढले होते. त्यावेळी मोठ्या आकारांच्या घरांची निकड सर्वांनाच भासू लागली. करोना संकटापासून मोठ्या घरांना वाढत चाललेली मागणी अद्याप कायम आहे.

आणखी वाचा-साखर निर्यातीवरील निर्बंध कायम ? गरजेइतक्या साखर उत्पादनानंतर होणार इथेनॉल निर्मिती

घरांच्या आकारातील वाढ (चौरस फूट)

महानगर २०१९ २०२४
दिल्ली १,२५० २,४५०
हैदराबाद १,७०० २,०१०
बंगळुरू १,२८० १,६३०
कोलकता १,००० १,१२५
पुणे ९१० १,१०३
चेन्नई १,१०० १,४५०
मुंबई ७८४ ८२५
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customers want big homes even as prices of ownership flats soar pune print news stj 05 mrj