टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणांतील पाणीसाठा कमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. शहराबरोबरच औद्योगिक क्षेत्र आणि जिल्ह्य़ातील सिंचनासाठी पाणी द्यायचे असल्याने शहराला रोज करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ात प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर (दोन एमएलडी) कपात करण्याचा निर्णय गुरुवारी कालवा समितीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार पुढील आठवडय़ापासून शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्यात येणार असून त्याबाबतचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.

कालवा समितीची बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, महापालिका प्रशासनातील अधिकारी तसेच शहरासह जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. बैठकीमध्ये शहराला लागणारे पिण्याचे पाणी, रब्बी हंगाम आणि उन्हाळी आवर्तन याबाबतचे नियोजन करण्यात आले.

समितीच्या बैठकीत टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासलासह जिल्ह्य़ातील इतर धरणांतील पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. दरवर्षी परतीच्या पावसामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होतो. मात्र, यंदा परतीच्या पावसाने ओढ दिल्याने खडकवासला धरणसाखळी वगळता जिल्ह्य़ातील इतर धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. परिणामी रब्बी हंगाम आणि उन्हाळी आवर्तनासाठी ठेवावा लागणारा राखीव पाणीसाठा लक्षात घेता शहराला दररोज करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ामध्ये दोनशे दशलक्ष लिटरने कपात करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले. त्यावर चर्चा होऊन सर्वानुमते शहराला प्रतिदिन १३०० ऐवजी ११५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यावर एकमत झाले, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. रब्बी हंगामासाठी दोन टप्प्यात पाणी सोडण्यात येणार आहे.

तसेच उन्हाळी आवर्तनासाठी तत्कालीन परिस्थिती पाहून नियोजन करण्याबाबत निर्णय झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत २८ कि.मी. लांबीच्या मुठा उजवा कालव्याची आवश्यक दुरुस्ती येत्या १५ ऑक्टोबपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तोपर्यंत इंदापूर भागाला शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी थांबविले आहे. खरीप हंगामासाठी साडेपाच टीएमसी पाणी सोडले आहे. तर, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी सहा टीएमसी पाणीसाठा राखीव असेल.

पुढील आठवडय़ात नियोजन

कालवा समितीच्या बैठकीत शहराला प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पुढील आठवडय़ापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठा नियोजनाचा आराखडा तयार करणार येईल. आयुक्त राव व महापौर मुक्ता टिळक यांच्यासमवेत बैठक आयोजित करून पुरवठय़ाचे नियोजन करण्यात येईल. पुढील दोन दिवसांत त्याबाबत वृत्तपत्रांमध्ये माहिती देऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे पालिकेचे अधीक्षक अभियंता (पाणी) व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cut into the citys water
Show comments