पुणे : बँका आणि विमा कंपन्यांकडे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात विदा आहे. सायबर गुन्हेगारांकडून या विदेची चोरी झाल्यास लाखो नागरिकांना आर्थिक फटका बसण्याचा धोका आहे. यामुळे बँका आणि विमा कंपन्यांनी सायबर हल्ल्यांपासून संरक्षणासाठी ठोस पावले उचलायला हवीत, असे मत भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे सदस्य राजय कुमार सिन्हा यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय विमा अकादमीमध्ये (एनआयए) विमा व सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना सिन्हा म्हणाले की, बँका आणि विमा कंपन्यांकडून तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी दक्षतेच्या पातळीवर त्यांच्याकडून हलगर्जीपणा दिसून येत आहे. काही वेळा वित्तीय संस्थांच्या व्यवस्थापनाला त्यांच्या संकेतस्थळावर झालेल्या सायबर हल्ल्याची वेळेत माहिती मिळत नाही. यामुळे अशा प्रकरणात नियामक संस्था म्हणून विमा कंपन्यांबाबत मवाळ भूमिका स्वीकारणे आम्हाला शक्य होत नाही. आम्हाला अशा कंपन्यांवर कारवाईचे पाऊल उचलावे लागते. काही प्रकरणांमध्ये कठोर स्वरूपाची कारवाईही करावी लागते.

बँका आणि विमा कंपन्या या त्रयस्थ संस्थांकडून अनेक कामे करून घेतात. सायबर गुन्हेगार हे तुमच्या याच यंत्रणेतील कच्चे दुवे हेरून हल्ले करतात. अशा वेळी त्रयस्थ संस्थेकडे बोट दाखवून कंपन्यांना जबाबदारी झटकता येणार नाही. राष्ट्रीय विमा अकादमीने विमा व सायबर सुरक्षा केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र सायबर धोक्यांपासून विमा क्षेत्राचे संरक्षण करण्यास मदत करेल. विमा क्षेत्रात सायबर सुरक्षा भक्कम करण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल ठरेल. या केंद्राने जागतिक पातळीवर विदेवर अवलंबून राहू नये. कारण जागतिक पातळीवरील विदा भारतीय संदर्भात योग्य ठरेलच असे नाही. याऐवजी भारतीय कंपन्यांच्या विदेचा वापर करावा, असेही सिन्हा यांनी नमूद केले.

यावेळी राष्ट्रीय विमा अकादमीचे संचालक बी. सी. पटनाईक म्हणाले की, या केंद्रामुळे सायबर सुरक्षा आणि विमा क्षेत्रातील संशोधन व शिक्षणात आमच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. सायबर धोके सातत्याने बदलत असून, उद्योगाने त्यांना सामोरे जाण्यासाठी ठोस धोका व्यवस्थापन धोरणे स्वीकारली पाहिजेत. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले हे केंद्र सायबर सुरक्षा जोखीम व्यवस्थापनात संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्य विकास वाढविण्यावर भर देईल.