पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने गुजरातमधील टोळ्यांनी देशभरात फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील चंदननगर भागातील एकाची २३ लाखांची फसवणूक प्रकरणात पोलिसांनी एकास मेहसाणा जिल्ह्यातून अटक केली. नवीन प्रवीणभाई चौहान (वय २२, रा. गोरिसाणा ता. खेरालू, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुजरातमधील वडनगर, सिपौर, शहापूर, शहापूर वड, खानपूर, छबलिया या गावांमध्ये शेअर बाजारात गुंत‌वणुकीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने वडगाव शेरी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची २३ लाख रुपयांची फसवणूक केली होती. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने पोलिसांकडे तक्रार दिली होती. तपासात आरोपी नवीन चौहान गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चंदननगर पोलीस ठाण्यातील सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, हवालदार भरत उकीरडे, शिपाई संतोष शिंदे आदी तपासासाठी गुजरातला रवाना झाले. चौहानला पाेलिसांनी ताब्यात घेतले. तेथील न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवून पोलिसांच्या पथकाने शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – खंडाळा घाटात ट्रकच्या धडकेने टेम्पो चालकाचा मृत्यू; दोघे जखमी

झारखंड, राजस्थानपाठोपाठ गुजरातमधील चोरटे सक्रिय

झारखंडमधील जामतारा, राजस्थानमधील गुरूगोठडी गावातील तरुणांनी देशभरातील नागरिकांची फसवणूक केली होती. सायबर गुन्हे करण्यात गुजरातमधील तरुण सामील झाले आहेत. ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाने अनेकांची फसवणूक केल्याची कबुली आरोपी नवीन चौहानने दिली आहे. या गावातील तरुण शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहेत. फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून महागड्या वस्तू आणि गाड्या खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, असे चंदननगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber gangs in gujarat and scam crimes across the country with the lure of investing in the stock market pune print news rbk 25 ssb