विद्याधर कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कंपनीचा संचालक असल्याचे भासवून दूरध्वनी आणि व्हाॅट्सॲप संदेश पाठवून सायबर चोरट्यांनी कोथरूड येथील बांधकाम व्यावसायिकाची ६६ लाख ४१ हजार ५२२ रुपयांची फसवणूक प्रकरणात आणखी दोघांना सायबर पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे.   

बेलाल शाबीर अन्सारी (वय २१) आणि कामरान इम्तियाज अन्सारी (वय २३, दोघेही रा. इजमायली, बिहार) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी बिशाल कुमार भरत मांझी (वय-२१, रा. लकरी खुर्द, सिवान, बिहार) या आरोपीला अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून ८ मोबाईल, ३६ सिम, १९ एटीएम, २ चेकबुक जप्त करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या आरोपींकडून  गावठी कट्टा आणि ६ काडतुसे जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती आर्थिक आणि सायबर शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल पाटील आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत उपस्थित होते.

‘कंपनीचा अध्यक्ष बोलत असून, पाठवलेला संदेश पाहा’, असा व्हॉट्सॲप कॉल त्याच कंपनीच्या लेखापालाला आला. त्यापाठोपाठ आलेल्या संदेशात अध्यक्षाचे छायाचित्र असल्याने लेखापालाची खात्री झाली. ‘खात्यावर त्वरित पैसे पाठवा. मी मीटिंगमध्ये आहे. कॉल करू नका’, असा संदेश वाचून लेखापालाने कोणतीही खातरजमा न करता ६६ लाख ४२ हजार रुपये पाठवले. पैशांची मागणी करणारा सायबर चोरटा आहे, हे लक्षात येताच लेखापालाच्या पायाखालची जमीन सरकली.

हेही वाचा >>>शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव; राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी केली ‘ही’ मागणी

आरोपींचा मोबाइल, ईमेल आयडी आणि बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला असता चोरटे बिहारमध्ये असल्याचे समजले. सायबर पोलिसांच्या पथकाने बिहार येथे जाऊन बिशाल मांझी याला ताब्यात घेतले होते. त्याच्या साथीदारांचे मोबाइल, ईमेल आयडीसह वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास करून मुख्य आरोपी बेलाल अन्सारी आणि कामरान अन्सारी यांना अटक करण्यात आली, आरोपींनी हैदराबादमधील एकाची २५ लाख रुपयांची फसवणूक केली असून, बिहार पोलीसही या टोळीच्या शोधात असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्यासह सावंत, उपनिरीक्षक प्रमोद खरात, संदेश कर्णे, दत्तात्रय फुलसुंदर, अश्विन कुमकर, प्रवीणसिंग राजपूत, वैभव माने, दिनेश मरकड, शिरीष गावडे, राजेश केदारी, योगेश व्हावळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सायबर चोरटे इंटरनेटच्या माध्यमातून कंपनीची माहिती घेऊन लेखापालाशी संपर्क साधतात. कंपनीच्या प्रमुखाचा डीपी ठेवून पैसे पाठविण्यास सांगतात. अशा पद्धतीचे गुन्हे घडत असल्याने आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी खातरजमा करणे आवश्यक आहे. – श्रीनिवास घाडगे, उपायुक्त, आर्थिक आणि सायबर शाखा