पुणे : घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी वाघोलीतील एका तरुणाची ऑनलाइन टास्कच्या आमिषाने २७ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण केसनंद परिसरात राहायला आहे. ४ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. घरातून ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले. सुरुवातीला चोरट्यांनी त्याला ऑनलाइन काम दिले. या कामापोटी त्याला परतावाही देण्यात आला. परतावा दिल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला.
हेही वाचा…निवडणुकीचा निकाल लागताच लाडकी बहिण योजनेबाबत अजितदादांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!
ग
ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी २७ लाख ४६ हजार रुपये गुंतविले. पैसे गुंतविल्यानंतर त्याला परतावा देण्यात आला नाही. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड तपास करत आहेत.
हेही वाचा…पुणे: तोतया डॉक्टरला न्यायालयाचा दणका, तोतयाला दोन वर्ष सक्तमजुरी
कोट्यवधींची फसवणूक
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी आतापर्यंत आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांच्या बतावणीकडे काणाडोळा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.