लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दीड कोटी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरातून अटक केली. या प्रकरणात आणखी एकास अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून मोबाइल संच, डेबिट कार्ड, परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.

पवनकुमार तत्ववेदी (वय ३५), पंकज रघुवीर तत्ववेदी (वय ३०, रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्ध शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी पवनकुमार याने तक्रारदाराला आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. त्यासाठी तक्रारदाराला खाते उघडण्यास सांगितले होते. खात्याचा सांकेतिक शब्द (पासवर्ड) तत्ववेदीने चोरला. त्यानंतर आरोपी दुबईत गेला. तक्रारदाराच्या सांकेतिक शब्दाचा गैरवापर करून दीड कोटी रुपयांचे आभासी चलन स्वत:च्या खात्यात जमा करून घेतले. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात पवनकुमार याने फसवणूक केल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तो भारतात परतल्याची माहिती मिळाली. तो दुबईला परत जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावरुन त्याला अटक केली.

आणखी वाचा-कोयनेचे पाणी शेती व पिण्यासाठी देण्याच्या मागणीवर सामोपचाराने तोडगा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

चौकशीत फसवणूक प्रकरणात त्याचा पवनकुमारचा भाऊ पंकज सामील असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पंकजला अटक केली. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे राठोड, बिराजदार, आदींनी ही कामगिरी केली.आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहेत. आभासी चलनात गुंत‌वणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे चोरटे परराज्यातील आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber thief who was fleeing abroad was caught at the airport pune print news rbk 25 mrj