लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सायबर चोरट्यांनी दोन महिलांसह तिघांची ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडी भागातील एका ३८ वर्षीय महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी ४२ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर जानेवारी महिन्यात संदेश पाठविण्यात आला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले.
महिलेला शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहिती देऊन तिला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ४२ लाख २९ हजार रुपये जमा केले. सुरुवातीला महिलेला परताव्यापोटी पैसे देण्यात आले. त्यानंतर महिलेला पैसे दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव तपास करत आहेत.
खराडी भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले असून, चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. सायबर चोरट्यांच्या आमिषांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नऱ्हे भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून समाज माध्यमातील मजकूर, तसेच चित्रफितींना दर्शक पसंती (व्ह्यू) मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते.
चोरट्यांनी महिलेला सुरुवातीला पैसे दिल्याने तिचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने दहा लाख २६ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.