पुणे : समाजमाध्यमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे छायाचित्र वापरून बनावट खाते उघडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतची माहिती समाजमाध्यमात प्रसारित केली असून, चोरट्यांकडून पाठविण्यात आलेल्या संदेशास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा >>> पूजा खेडकर यांच्या गैरवर्तणुकीचा आता इंग्रजी भाषेत अहवाल; खेडकर यांचा खुलासाही घेण्याची केंद्र सरकारची सूचना
अमितेश कुमार यांच्या ओळखीतील एकास संदेश पाठविण्यात आला होता. ‘मी अमितेश कुमार. परदेशात कामानिमित्त गेलो आहे. मला तातडीने पैसे हवे आहेत,’ असे संदेशात म्हटले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीने अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा अशा प्रकारचा संदेशावर विश्वास ठेवू नये, असे अमितेश कुमार यांनी सांगितले. ज्या मोबाइल क्रमांकावरून संदेश पाठविण्यात आला होता. संबंधित मोबाइल क्रमांक परदेशातील आहे. सायबर चोरट्यांनी अमितेश कुमार यांचे छायाचित्र वापरून संदेश पाठविल्याचे उघड झाले. अशा प्रकारच्या संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. सायबर चोरट्यांनी यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावे बनावट खाते उघडून पैशांची मागणी केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.