पुणे : सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन ३८ लाख रुपयांची फस‌वणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पर्वती आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी पर्वती भागातील एका ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकाने याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ‌ नागरिक अरण्येश्वर भागात राहायला आहेत. गेल्या महिन्यात १५ डिसेंबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका बँकेतील अधिकारी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँकेकडून डेबिट कार्ड सुविधा अद्ययावत करण्यात येत आहे, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून १९  लाख ९० हजार रुपये चोरून नेले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करत आहेत.

हेही वाचा >>> ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मृत्यू ; कात्रज- हांडेवाडी रस्त्यावर अपघात

दुसऱ्या एका घटनेत सायबर चोरट्यांनी हडपसर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची १८ लाख २५ हजार रुपयांची फस‌वणूक केली. सायबर चाेरट्यांनी २१ डिसेंबर रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीचे देयक थकीत असल्यााने गॅस पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याची बतावणी चाेरट्यांनी केली. त्यानंतर देवेश जोशी असे नाव असणाऱ्या चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याची माहिती चोरट्यांनी घेतली. या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून १८ लाख २५ हजार रुपये चोरुन नेले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळंगे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber thieves dupe senior citizens of rs 38 lakh on after taking bank account information pune print news rbk 25 zws