आर्थिक अडचणीमुळे ४० लाखांचे कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संगणक अभियंत्याला सायबर चोरट्यांनी कर्ज मंजुरीच्या आमिषाने २७ लाख ४५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>>काय सांगता? पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर नियम तोडणाऱ्यांची घेतली जाते दहा गुणांची परीक्षा
याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्या प्रकरणी सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. वडिलांचे आजारपण तसेच पत्नीशी झालेल्या वादातून न्यायालयात दाखल केलेल्या घटस्फोटाच्या खटल्यासाठी तक्रारदार तरुणाला पैशांची गरज होती. कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या खासगी वित्तीय संस्थांशी त्याने संपर्क साधला होता.
हेही वाचा >>>पुणे: ऋण वसुली न्यायाधिकरणाकडून आयोजित लोकन्यायालयात ६०४ कोटी रुपयांची वसुली; २३० खटले तडतोडीत निकाली
सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी त्याला कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी दीड लाख रुपये पाठविण्यास सांगितले. तरुणाने ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यावर दीड लाख रुपये पाठविले. त्यानंतर चोरट्यांनी वेगवेगळी कारणे सांगून तरुणाकडून २७ लाख ४५ हजार रुपये उकळले. कर्ज मंजूर झाले नसल्याने तरुणाला संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने तपास करत आहेत.