पुणे: शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून सायबर चोरट्यांकडून सामान्यांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत तक्रारदारांची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढते आहे. अशा प्रकारचे दररोज किमान दोन गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होतात. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे दोन वेगवेगळे गु्न्हे वाघोली पोलीस ठाण्यात दाखल झाले. पहिल्या घटनेत वाघोली भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३९ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आली. याबाबत एका ४८ वर्षीय तक्रारदाराने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशाच प्रकारे आणखी एकाची ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड तपास करत आहेत.

गॅस जोड देण्याच्या आमिषाने साडेचार लाखांची फसवणूक

नवीन गॅस जोड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची चार लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कात्रज भागातील आंबेगाव परिसरात वास्तव्यास आहे. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. गॅस कंपनीकडून नवीन गॅस जोड देण्यात येणार आहे. गॅस जोड नोंदणीसाठी वैयक्तिक माहिती द्यावी लागेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. चोरट्यांनी तक्रारदार तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने चार लाख ४० हजार रुपये चोरट्यांनी चोरुन नेेले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.

कारवाईची भिती दाखवून ३२ लाखांची फसवणूक

काळ्या पैसा व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणात पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी हडपसर भागातील एकाची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी तक्रारदाराला धमकावून वेळोवेळी पैसे घेतले. हडपसर भागातील एकाची चोरट्यांनी बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करुन चोरट्यांनी दोन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करत आहेत.

Story img Loader