लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: लष्करातून निवृत्त झालेल्या सुभेदारास सायबर चोरट्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवृत्त सुभेदारांनी फिर्याद दिली आहे.

सायबर चोरट्यांनी निवृत्त सुभेदारास संदेश पाठविला होता. समाजमाध्यमावर प्रसारित होणाऱ्या जाहिराती तसेच ध्वनिचित्रफीतीला दर्शक पसंती (लाइक्स) दिल्यास त्यात मोठा नफा मिळेल. प्रत्येक दर्शक पसंतीला पैसे देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला चोरट्यांनी तक्रारदार निवृत्त सुभेदारास काही रक्कम दिली. तक्रारदार हे सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडले. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दहा ते वीस टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले.

आणखी वाचा- पुणे: नवले पूल परिसरात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. तुम्हाला दिलेले उद्दिष्ट साध्य केल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचे चोरट्यांनी सांगितले. निवृत्त सुभेदाराने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने एक कोटी दहा लाख रुपये जमा केले. त्यांनी नातेवाईकांकडून काही रक्कम घेतली होती. ही रक्कम त्यांनी चोरट्यांच्या हवाली केली. त्यांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.

पाच बँकांतील खात्यात पैसे जमा

चोरट्यांनी पाच बँकातील १२ खात्यांत पैसे जमा करुन घेतले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber thieves fraud with retired army man for 1 crore rs pune print news rbk 25 mrj