पुणे : घटस्फोट झाल्यानंतर पुनर्विवाह करण्याच्या उद्देशातून समाज माध्यमावर जाहिरात करणे ६० वर्षांच्या ज्येष्ठाला अंगलट आले. सायबर चोरट्यांनी त्यांच्याच साथीदार महिलेला पुढे करून आर्थिंक फसवणुकीचा डाव टाकल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी महिलेच्या मागणीनुसार ज्येष्ठाने तिला पाठविलेले चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देत सायबर चोरट्यांनी त्यांची ७२ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी कर्वेनगरमधील ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक असून, त्यांचा घटस्फोट झाला आहे. पुर्नविवाह करण्याच्या उद्देशातून त्यांनी समाज माध्यमावर जाहिरातीद्वारे इच्छा प्रदर्शित केली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी प्रतिसाद देत पाठविलेला अर्ज फिर्यादीने माहिती भरून पाठविला, त्यानंतर मनीषा शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांना संपर्क करून लघुसंदेशाद्वारे लग्नाचे आमिष दाखवले. त्यांच्यात व्हॉटसअॅपवर बोलणे सुरू झाले. त्यातून ज्येष्ठाला अश्लिल चित्रीकरण तयार करायला भाग पाडले. हे चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन तिने बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.
हेही वाचा >>>पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
विक्रम राठोड याने तक्रारदाराला दूरध्वनी तसेच लघुसंदेशाद्वारे संपर्क केला. दिल्लीच्या सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन सेल येथे गुन्हा दाखल असल्याची भीती घातली. त्याने राहुल शर्मा याच्याशी संपर्क साधावा, असे सांगितले. अन्यथा यु ट्युबवर तुमचे चित्रीकरण प्रसारित करतो, अशी धमकी दिली. त्यानुसार तक्रारदार ज्येष्ठाने आरोपी राहुल शर्माला संपर्क केल्यानंतर त्याने ७२ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.