पुणे : सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक, ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार सर्वाधिक आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चोरट्यांकडून नागरिकांना समाज माध्यमातून एपीके फाईल पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा प्रकारची फाईल उघडताच बँक खात्याला जोडलेल्या मोबाइल क्रमांकाची माहिती चोरून चोरट्यांनी सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकस सहकारनगर भागात राहायला आहेत. चोरट्यांनी गेल्या माहिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. एका खासगी कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण कक्षातून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती.

चोरट्यांनी त्यांना आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी एक मोबाइलवर एक फाईल पाठविली आणि ही फाईल उघडण्यास सांगितले. फाइल उघडल्यानंतर बँक खात्याला जोडलेल्या मोबाइल क्रमांकाचा गैरवापर करुन चोरट्यांनी ज्येष्ठाच्या खात्यातून चार लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. बँक खात्यातून परस्पर रोकड चोरुन नेण्याचा आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांनी तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करत आहेत. मोबाइल क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने आमिष दाखविल्यास, तसेच फाईल पाठविल्यास शक्यतो प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.