महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली आजही मैलोन्मैल चालत शाळेत जातात. आर्थिक परिस्थितीमुळे एसटीचं साधं तिकीटही त्यांना परवडेलच याची खात्री नसते. त्यातूनच मग अनेकांची शाळा आणि शिक्षण अशा दोन्ही गोष्टी मागे पडत जातात आणि कायमच्या दुरावतात. अशा मुलांना त्यांची स्वतची, हक्काची सायकल मिळाली तर?

सहसा शहरी भागात राहणाऱ्या आणि स्वतची दुचाकी, चारचाकी घेऊन फिरणाऱ्या आपल्यासारख्या कुणाच्या डोक्यातही न येणारा हा विचार सत्तार शेख यांच्या डोक्यात आला आणि ते कामाला लागले!  त्यासाठी त्यांनी रस्ता निवडला तो समाजमाध्यमाचा, म्हणजेच सोशल मिडियाचा!

अहमदनगर जिल्ह्य़ातील जामखेड इथे सत्तार ‘ प्रयोगवन परिवार ’ या स्वयंसेवी संस्थेच्या रुपात कार्यरत आहेत. सत्तार सांगतात, वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांसाठी काम करीत असताना कावेरी पवार नावाची एक शाळकरी मुलगी संडे स्कूल या माझ्या उपक्रमामध्ये सहभागी झाली. शिकण्यातला उत्साह, नवीन गोष्टींबद्दल वाटणारे कुतूहल बघून तिला शाळेत घालावे असा विचार केला. तिला आनंद झाला मात्र तिचे पालक तयार नव्हते. मग आम्ही तिच्या पालकांचं समुपदेशन केलं आणि ते तयार झाले. शाळा लांब होती, चालत गेली तर चार दिवस शाळेत जाईल आणि मग घरी बसेल या विचाराने आधीच तिच्यासाठी एका जुन्या सायकलची व्यवस्था केली. कावेरी सायकल वरुन शाळेत जायला लागली. आपल्या आजूबाजूला कावेरीसारखी अनेक मुलं आहेत ज्यांचं शिक्षण केवळ शाळा लांब, वाहतुकीचे पर्याय नाहीत म्हणून सुटून जाते याची जाणीव झाली आणि सायकलदान महाअभियान सुरु झालं. सायकलदान महाअभियान या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला पुण्यातल्या ह्य़ुमन सोसायटी आणि महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ रुजविण्याचे काम करणाऱ्या टीम एकलव्य या गटांचंही भरपूर सहकार्य आहे. गेले तीन महिने सायकलदान प्रकल्पानं चांगलंच बाळसं धरलंय. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्य़ातल्या अकोले तालुक्यात १५ सायकलींचं वाटप करण्यात आलंय. सध्या आणखी सुमारे १० सायकली संकलित करण्यात आल्या आहेत. त्या योग्य विद्यार्थ्यांंपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार आहेत.  विद्यार्थी अथवा शाळांकडून सायकलींची मागणी करण्यात आली की त्या परिसरातील स्वयंसेवक जाऊन शाळा, भौगोलिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती यांची पाहणी करतो. या पाहणीतून त्या विद्यार्थ्यांला खरोखरीच सायकलची गरज आहे असे वाटले तर त्या विद्यार्थ्यांला सायकल दिली जाते. वाडय़ावस्त्यांवर किंवा आदिवासी पाडय़ांवर राहाणाऱ्या, निम्न आर्थिक गटातल्या मुली आणि मुलं असा आमचा प्राधान्यक्रम आहेत आणि येत्या वर्षभरात ३०० मुली आणि २०० मुलांना सायकली देऊन त्यांची शाळा सुरु ठेवणं हे आमच्या पुढे उद्दिष्ट आहे. साधारण ५ वी ते १० वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे काम आम्ही करत आहोत, असे सत्तार यांनी सांगितले.

सायकली देणारे अनेक हात पुढे यावेत अशी इच्छाही ते व्यक्त करतात. सायकलची दुरुस्ती करुन, आर्थिक दृष्टीने शक्य झाल्यास तिचा वाहतूक खर्चही सायकल देणाऱ्याने केला तर आमचे काम सोपे होईल, असे सत्तार सांगतात. आत्तापर्यंत पुणे शहरातून सर्वाधिक सायकली या अभियानाला मिळाल्या आहेत. नाशिक, शिर्डी, ठाणे, मुंबई इथूनही सायकल द्यायची इच्छा व्यक्त करणारे लोक सत्तार यांना संपर्क साधत आहेत.  फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप हे रिकामटेकडेपणाचे उद्योग असा एक सर्वसाधारण समज आहे, मात्र त्याचा विधायक उपयोग करु पहाणाऱ्यांसाठी सत्तार शेख आणि त्यांची ‘प्रयोगवन परिवार संस्था’ आदर्शवत काम करत आहे.

वापरात नसलेल्या, पण दुरुस्त करुन वापरायोग्य करता येतील अशा सायकली आपल्याकडे असतील तर फेसबुकवरच्या ‘सायकलदान महाअभियान’ या गटाशी तुम्ही संपर्क करु शकता. ७८७५७५३५५० या क्रमांकावर सत्तार शेख यांच्याशी संपर्क करुनदेखील तुम्ही सायकल देऊन या मोहिमेला हातभार लावू शकता.

भक्ती बिसुरे – bhakti.bisure@expressindia.com

Story img Loader