पिंपरी : निगडी, प्राधिकरणातील पाच चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर प्रायोगिक तत्त्वावर हरित सेतू प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत सार्वजनिक उद्याने, हिरवळीच्या ठिकाणांना सायकल ट्रॅक आणि पदपथांनी जोडले जाणार आहे. पदपथ आणि सायकल मार्गाच्या दुतर्फा सावली देणाऱ्या झाडांची लागवड करून काही ठिकाणी छत आच्छादने लावली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी १३३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांसह नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिकेने हरित सेतू प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात निगडी-प्राधिकरणात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पाच चौरस किलोमीटर क्षेत्रात २०.२० किलोमीटर लांबीचे काँक्रीटचे रस्ते करण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> अजितदादांच्या आमदाराबाबत जनतेत नाराजी, महायुतीचा एक आमदार कमी होऊ नये यासाठी जागा सोडा; शिवसेनेची मागणी
दोन्ही बाजूंना दोन मीटरचे पदपथ, १.८ मीटरचा सायकल ट्रॅक आणि दोन मीटरचा समांतर वाहनतळ तयार केला जाणार आहे. या कामासाठी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने एकूण १६० कोटी २७ लाख रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली होती. या प्रक्रियेत सात ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यांपैकी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीची १७.१ टक्के कमी दराची निविदा स्वीकृत करण्यात आली. प्रकल्पासाठी १३३ कोटी ४८ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पेव्हटेक कन्सल्टिंग इंजिनीअरिंग सर्व्हिसेस सल्लागार आहेत.
हेही वाचा >>> जलसंवर्धनातूनच शेतकरी आत्महत्या रोखणे शक्य, देवेंद्र फडणवीस यांचे मत
दोनशे कोटींचे हरित रोखे
या प्रकल्पासाठी महापालिका हरित रोखे (ग्रीन बॉण्ड्स) विक्रीतून दोनशे कोटींचे कर्ज उभारणार आहे. यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. हरित रोखे उभारण्याची कार्यवाही वित्त व लेखा विभागाकडून सुरू आहे. हे रोखे उभारल्यानंतर केंद्र सरकारकडून महापालिकेला २० कोटींचे अनुदान मिळणार आहे.
पाच ठिकाणी राबविणार प्रकल्प
निगडी, प्राधिकरणातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यात पेठ क्रमांक २४, २५, २६, २७, २८ आणि २७ ‘अ’ या परिसराचा समावेश आहे. हे क्षेत्रफळ पाच चौरस किलोमीटर इतके आहे. हरित सेतू प्रकल्पामुळे दैनंदिन गरजांसाठी वाहनांचा वापर कमी होईल. पदपथाचा वापर दिव्यांगासह सर्व वयोगटांतील नागरिकांना करता येईल. सायकल चालवणे सहज शक्य होणार आहे. प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केला.