लोकसत्ता प्रतिनिधी,
पुणे: बिपरजॉय या अतितीव्र चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र या चक्रीवादळात नुकसानकारक क्षमता आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांना धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला.
बिपरजॉय चक्रीवादळ १५ जूनला गुजरात, पाकिस्तानच्या किनाऱ्याला धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत चक्रीवादळाबाबत माहिती दिली.
बिपरजॉय चक्रीवादळ १२५ ते १३५ किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याच्या वेगाने जाखू बंदरानजीक सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी १५ जूनला सायंकाळी ओलांडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगरसह काही भागांमध्ये सुमारे २० सेंटीमीटर इतका पाऊस पडू शकतो. या चक्रीवादळाची नुकसान करण्याची क्षमता मोठी आहे, असे महापात्रा यांनी सांगितले.